शिवाजी महाराजानी घराणेशाही उभी केली नाही :शरद पवार

पुणे, दि. 19 छत्रपती महारांजांनी परकीय आक्रमणाविरोधात राज्य उभे केले पण घराणेशाही उभी केली नाही, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे देशाचे संरक्षण करणार्‍या भावी पिढीला युद्धनीती, प्रशासन आणि शिस्त बाळगण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षाही पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
महानगरपालिकेच्या वतीने खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. एअर मार्शल के. एस. गिल, महापौर वैशाली बनकर यांच्यासह उपमहापौर दीपक मानकर, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण आणि नगरसेवक उपस्थित होते.

पवार म्हणाले, हिंदवी स्वराज्य स्थापन झाले तेव्हा राज्यातील जनता परकीय आक्रमणाखाली चिरडली जात होती. त्यावेळी दिल्लीत मोघलांचे राज्य होते. मात्र, शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करताना भोसल्यांची राजवट निर्माण केली नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज युद्धनीतीमध्ये कुशल होते. मर्यादित सैन्य आणि शस्त्रसाठा असतानाही प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणे हे त्यांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य होते. राज्य करताना महाराजांनी अनेक आदर्शही घालून दिले. दुष्काळी परिस्थितीत जनतेला मदत करण्यासाठी संपत्ती काढून शेतीची सामुग्री तयार करण्यास सांगितले. महिलांवरील अत्याचार थांबविले. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन राज्य केले. त्यामुळे 350 वर्षानंतरही समाजमनातील त्यांचे स्थान कायम आहे. त्यामुळे एनडीएमधून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला केवळ युद्धनीतीच नव्हे तर प्रशासन आणि शिस्त बाळगण्याची प्रेरणाही त्यामुळे मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्राला नव्हे तर देशाला प्रेरणा दिली आहे. शिवाजी महाराज हे शौर्याचे प्रतीक असल्याचेही एअर मार्शल गिल यांनी सांगितले.

एनडीएची स्थापना झाल्यापासून एनडीएने देशाला अनेक चांगले संरक्षण अधिकारी दिले आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री असताना दर सोमवारी माझी हवाई, सैन्यदल आणि नौदलाच्या प्रमुखांबरोबर बैठक होत असे. विशेष म्हणजे हे तिन्ही प्रमुख एनडीएचे कॅडेट होते, अशी आठवणही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी यावेळी सांगितली.