रणनीती निश्‍चित करण्यासाठी सोनियांनी घेतली बैठक

नवी दिल्ली, दि. 19 – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्याचा प्रारंभ सोमवारपासून होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर, केंद्र सरकारचे नेतृत्व करणार्‍या काँग्रेसची रणनीती निश्‍चित करण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज येथे बैठक घेतली.

अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यात कोळसा खाणवाटप आणि 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यांवरून विरोधक सरकारला पुन्हा खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळेच विरोधकांच्या हल्ल्याची धार बोथट करण्याच्या उद्देशाने रणनीती ठरवण्यासाठी सोनियांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावल्याचे मानले जात आहे. या बैठकीला संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी, संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ग्रामविकास मंत्री जयराम रमेश आणि सोनियांचे राजकीय सचिव अहमद पटेल उपस्थित होते.

कोळसा खाणवाटप घोटाळ्याच्या तपासाबाबतच्या सीबीआय अहवालात बदल करून तो सौम्य करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप केल्याचा आरोप करणारे वृत्त अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. हा अहवाल बदलण्यापूर्वी कायदामंत्री अश्‍वनीकुमार यांनी सीबीआयच्या प्रमुखांना पाचारण केले होते, असा दावाही संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. त्यामुळे कोळसा खाणवाटप घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. भाजपने अश्‍वनीकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार असल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे. याशिवाय, 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करणार्‍या जेपीसीच्या अहवालाचा मसुदा फुटला आहे. त्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यावरूनही विरोधक सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जेपीसीचा अहवाल म्हणजे काँग्रेसचा अहवाल असल्याची टीकाही भाजप आणि भाकपने केली आहे.

साहजिकच, कोळसा खाणवाटप आणि 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यांवरून संसदेचे कामकाज पुन्हा प्रभावित होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर, सोनियांनी बोलावलेल्या बैठकीचे महत्त्व वाढले आहे. सरकार बहुप्रतीक्षित भूसंपादन विधेयक संसदेत मांडण्यासाठी प्रयत्नशील आहे. कालच या विधेयकाबाबत सर्वपक्षीय बैठकीमध्ये व्यापक सहमती झाली. त्यामुळे आजच्या बैठकीत या विधेयकाबाबतही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment