मुशर्रफ अटकेत – पोलिस कोठडीत रवानगी

इस्लामाबाद दि.१९- पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना त्याच्या चक शाहजद येथील फार्म हाऊसवरून अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने कालच मुशर्रफ यांना २००७ सालची आणीबाणी आणि न्यायाधीशांचे निलंबन प्रकरणात अटक करण्याचे आदेश दिले होते आणि ते ऐकताच मुशर्रफ न्यायालयातून सुरक्षा रक्षकांसह निघून गेले होते. त्यानंतर त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुशर्रफ यांना त्यांच्या फार्महाऊसवरून शुक्रवारी म्हणजे आजच अटक केली आणि त्यांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलिस अधिकार्यां नी मुशर्रफ यांना न्यायालयीन कोठडीत ठेवले तरी चालेल असे सांगितले होते. मात्र आणीबाणी प्रकरणात मुशर्रफ यांच्यावर सुमारे साठ जणांनी केसेस दाखल केल्या असून त्या पक्षकारांच्या सर्व वकीलांनी मुशर्रफ यांना पोलिस कोठडीच देण्याची आग्रही मागणी केली आणि अटक करून आणताना त्यांना बेड्या का ठोकल्या गेल्या नाहीत असा जाबही विचारला. त्यानंतर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मोहम्मद अब्बास शाह यांनी मुशर्रफ यांना पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस कोठडीत मुशर्रफ यांच्या जीवाला धोका होऊ शकतो असे मुशर्रफ यांचे वकील कमर अफझल यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांना त्यांच्या फार्महाऊसमध्येच नजरकैदेत ठेवावे अशीही मागणी केली गेली मात्र न्यायाधीशंानी त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली. काल गुरूवारी कागदपत्रांची पूर्तता होऊ न शकल्याने मुशर्रफ यांच्या वकीलांना अटकपूर्व जामीन मिळू शकला नव्हता असेही समजते.