पुणे स्फोटातील दहशतवादी हिमायत बेगला फाशी

पुणे दि.१८ – पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला दहशतवादी मिर्झा हिमायत इनायत बेग याला पुणे सत्र न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा ठोठावली. पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयाने सोमवारी बेगला बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवले होते. हिमायत बेग याला कट रचणे, लोकांचा मृत्यू घडवणे, हत्येचा प्रयत्न, दहशतवादी कृत्य या कलमांखाली दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाने बेगला पाच गुन्ह्यांमध्ये फाशी आणि पाच गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

फाशीची शिक्षा झाल्याचे ऐकताच हिमायत बेग कोर्टातच बेशुद्ध पडला. ’मी निर्दोष आहे’ असे म्हणणारा हिमायत बेग कोर्टात ढसढसाही रडला होता. दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. त्यानंतर आज (गुरुवारी) त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीमध्ये १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने ‘आरडीएक्स’ चा स्फोट घडवून आणला होता. यात १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ६४ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटप्रकरणी दहशवादविराधी पथकाने (एटीएस) इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी असलेल्या हिमायत बेगला सात सप्टेंबर २०१० ला बीड येथून अटक केली होती.

या प्रकरणात एटीएसने एकून ४० जणांवर आरोप निश्चित केले होते. हिमायत बेग हा त्यातील मुख्य आरोपी होता. या बॉम्बस्फोटातील अन्य सहा आरोपी फरार आहेत. सरकार तर्फे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी तर बचाव पक्षातर्फे वकील रेहमान व वकील कायनाथ शेख यांनी काम बघितले. या खटल्यामध्ये १०९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाच्या निर्णयानंतर बेगचे वकील ए. रहमान यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.
 यासीन भटकळ (कारवार, कर्नाटक) ,मोहसीन चौधरी (मिठानगर, कोंढवा,पुणे) ,इक्बाल भटकळ (कारवार, कर्नाटक), फय्याज कागजी (शहेनशहानगर, बीड, सध्या सौदी अरेबिया) हे आरोपी फरार आहेत. सय्यद जबिउद्दिन अन्सारी (रा.धनगर गल्ली, बीड) (सौदी अरेबिया सरकारकडून प्रत्यार्पण करून भारतात आणले. दिल्ली, मुंबई पोलिसांसह एनआयएकडून तपास. स्फोटप्रकरणी अद्याप अटक नाही.)

पोलिसांचे एकत्रित यश
स्फोटाचे तत्कालीन तपास अधिकारी विनोद सातव म्हणाले, मुंबई-पुणे एटीएसचे अधिकारी, गुन्हे शाखेचे विविध वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एटीएस प्रमुख, पोलिस महासंचालक यांनी या प्रकरणात विशेष परिश्रम घेतले. हिमायत बेग दोषी ठरणे हे सांघिक कामाचे यश आहे.