ठाणे- ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर, धोकादायक इमारतींवर सुरू झालेल्या कारवाईविरोधात ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसनी गुरुवारी बंद पुकारला आहे. काही जनाच्या जमावाने तीन हात नाक्याजवळ तोडफोड केल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
ठाणे बंदला गालबोट; वाहनांची तोडफोड
या बंदला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून ठाणे शहरातील रिक्षा, बस, दुकाने, पेट्रोलपंप बंद आहेत.
मुंब्रा, वागळे इस्टेट, कळवा, खारेगाव, लोकमान्य नगर या भागातल्या बेकायदा इमारतींमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची व्होट बँक वास्तव्याला आहे. दवाखाने, मेडिकल, दूध आणि अन्य अत्यावश्यक सेवांना या बंदमधून वगळण्यात आले आहे. मात्र, अन्य कुठलाही व्यवहार शहरात सुरू राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले आहेत.
नेहमी पहाटेपासूनच गजबजणा-या तलावपाळीजवळील भाजीपाला बाजारपेठत आज शुकशुकाट जाणवत आहे. टीएमटी-एसटी व रिक्षाही रस्त्यावर उतरलेल्या नाहीत. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा टीएमटी बसेसच्या टायरमधील हवा काढल्याचे समजते.
