जेडीयुसोबतची युती तोडण्यासाठी निवडणुकांनंतर मुहूर्त

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसापासून पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून सुरू असलेली नितीश कुमार यांची मनमानी आणि त्यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या जाहीर टीकेमुळे भाजप संतापला आहे. जेडीयुशी असलेली युती तोडण्यासाठी भाजपच्या बिहारी नेत्यांनी पक्षनेतृत्वावर दबाव वाढवला आहे. कर्नाटकच्या निवडणुकांनंतर दोन्ही पक्षांतील ‘राजकीय’ घटस्फोटाचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापासून जेडीयुच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत रविवारी पंतप्रधानपदाचा उमेदवार धर्मनिरपेक्ष असावा व भाजपने तो डिसेंबरपर्यंत जाहीर करावा, असा ठराव संमत करण्यात आला. मोदींच्या नावाला विरोध करण्यासाठीच नितीश कुमार यांनी ही खेळी केली होती. यावरच नितीश कुमार थांबले नाहीत. पक्षनेत्यांसमोर बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवला.

नितीश कुमारांना जशास तसे उत्तर देण्याची मागणी पक्षात होत आहे. बिहारमधील भाजप नेत्यांनी जेडीयुशी असलेली युती तोडण्याचा आग्रह धरला आहे. आता माघार घेणे शक्य नाही,’ असा कडक सूर भाजप नेत्यांनी लावला आहे. कर्नाटकच्या निवडणुका होईपर्यंत थांबण्याचा भाजपचा विचार असल्याचे समजते. ही निवडणूक झाल्यानंतर एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊनच भाजप जेडीयुशी रीतसर काडीमोड घेण्याची तयारी सुरु असल्याचे समजते.