एप्रिलमध्ये घटणार सोन्याची आयात

मुंबई दि.१६- सोन्याच्या दरात झालेली अभूतपूर्व घसरण पाहता या महिन्यात सोन्याची आयात किमान २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता मुंबई बुलियन असोसिएशनचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले या महिन्यातील सोने आयात ५३.२५ टनांवर येईल असा अंदाज आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये ७१ टन सोने आयात झाली होती.

कंबोज यांनी दिलेल्या माहितीनुसार गेले दोन दिवस सोन्याचे दर घसरत आहेत आणि ते आणखीही घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी आत्ता सोने खरेदी न करता कांही काळ प्रतीक्षा करतील आणि सोन्याचे दर स्थिर होऊन पुन्हा चढणीकडे लागले की व्यापार्‍याची खरेदी सुरू होईल. त्यामुळे आयात कमी करावी लागेल.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने गडगडले आहे. आणखी काही काळ हाच ट्रेंड सुरू राहील असा अंदाज आहे. मात्र एकदा किमती स्थिर झाल्या की सोन्याचे व्यवहार पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू होतील व त्यावेळी आयात पुन्हा वाढू शकेल मात्र एप्रिलमध्ये आयात वाढीची शक्यता नाही.