हा निनावी नेता कोण ?

भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी  गौप्यस्फोट केला असून केन्द्रातल्या संपुआघाडीतल्या कोणा तरी नेत्याने हे सरकार पाडण्याचा मनोदय आपल्या जवळ व्यक्त केला होता असे त्या नेत्याचे नाव न घेता जाहीर केले आहे. सरकार पाडण्यास उत्सुक असलेल्या या नेत्याने आपल्याकडे मदत मागितली होती पण आपण ती दिली नाही असही गडकरी यांनी म्हटले आहे. मुळात तो नेता स्वतःच सरकार पाडण्यास सक्षम होता म्हणजे त्याच्या हातात तेवढे संख्याबळ होते पण तरीही त्याने आपल्याला मदत मागितली होती. ते स्वतः सरकार पाडण्यास पुढाकार घेणार नव्हते पण सरकार पाडण्यासाठी आवश्यक असलेली भूमिका मतदानाच्या वेळी घेणार होते असे गडकरी यांच्या या वक्तव्यातून स्पष्ट होते.

त्यांची तेवढी ताकद असतानाही ते भाजपाची मदत का मागत आहेत असा संशय आल्यामुळे  गडकरी यांनी त्यांना मदत देण्यास नकार दिला. नंतर या नेत्याने स्वतःही ते काम केले नाही. गडकरी यांनी या नेत्याचे नाव सांगितले नाही. तसे ते सांगता येत नाही कारण अशा प्रकारच्या चर्चा या गुपचुप होत असतात आणि त्यांचे कसलेही पुरावे मागे ठेवण्यात येत नाहीत. मग असा गौप्यस्फोट कुणी केला की, तो नेता कोण असेल यावर लोक अंदाज बांधायला लागतात. गडकरी यांनी या नेत्याचे नाव तर जाहीर केले नाहीच पण मग त्यांनी ही माहिती तरी का जाहीर केली ? असा प्रश्न पडतो. नाव सांगता येत नसेल तर त्यांनी हा प्रसंगही सांगायला नको होता. सरकार पाडणे आणि नवी आघाडी निर्माण करणे याबाबत शरद पवार आघाडीवर असू शकतात. गडकरी यांच्या निवदनावरून तरी पवारांचा संशय घेता येतो.

लोक फार तपशीलात विचार करीत नाहीत पण वरवर विचार करून हा नेता म्हणजे शरद पवारच असणार असा तर्क करतात. त्यामुळे पवारांवर विनाकारण बालट येऊ शकते. हा पवारांच्या प्रतिमेचा आणि विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने तो नेता म्हणजे पवार नव्हे असा तर खुलासा केला आहेच पण मुळात गडकरी यांचा हा गौप्यस्फोट बनावट असल्याचे म्हटले आहे. खरे तर गडकरी यांनी आपल्या या गौप्यस्फोटातच तो नेता स्वतःच्या ताकदीवर सरकार पाडू शकला असता असे म्हणून ठेवले आहे. त्यामुळे पवारांकडे संशयाची सुई वळण्याचे काहीही कारण नाही. पवारांच्या हातात केवळ आठ खासदार आहेत.
ममता बॅनर्जी आणि करुणानिधी यांच्या हातात प्रत्येकी १९ खासदार असताना त्यांच्याच्याने सरकार पाडणे झाले नाही. तिथे पवारांच्या या आठ खासदारांना सरकार पाडणे कसे शक्य झाले असते ? तेव्हा पवारना या प्रकरणाच्या संदर्भात आपण संशयमुक्त केले पाहिजे. मुळात पवारांना हे सरकार पाडण्याचे काहीही कारण नाही. कारण त्यांनी केन्द्रातले सरकार पाडले असते तर त्यांचे महाराष्ट्रतले सरकारही पडले असते. हातातले हे सरकार गमावण्याचे आणि भाजपाशी हातमिळवणी करण्याचे त्यांना काही एक कारण नाही.

तो नेता मुलायमसिंग हा असू शकतो. कारण मुलायमसिंग यांना या गौप्यस्फोटातले वर्णन लागू पडते. मुलायमसिंग सरकार पाडू शकतात आणि त्यांना सरकार पाडण्याची गरजही होती. ते या सरकारला वैतागले आहेत. त्यांच्यासाठी हे सरकार म्हटले तर सोयीचे आणि म्हटले तर गैरसोयीचेही आहे. कारण त्यांना केन्द्रातल्या या सरकारला  पाठींबा दिल्याशिवाय काही पर्याय नाही. त्यांच्या डोक्यावर  सीबीआय ची टांगती तलवार आहे. तिचा वापर करून मुलायमसिगांना ब्लॅक मेल केले जाते आणि कारवाईची धमकी देऊन त्यांचा पाठींबा कायम ठेवला जातो. अर्थात  त्याला ते स्वतःच जबाबदार आहेत.

कारण त्यांच्या मुख्यमंत्री चिरंजीवांनी निष्काळजीपणाने मालमत्तेचे विवरण जाहीर केले आहे आणि त्यात चूक करून ठेवली आहे. सरकार मुलायमसिगांवर सतत दबाव आणते म्हणून हे सरकार पाडून या जाचातून एकदाचे मुक्त व्हावे असे त्यांना वाटले असणे शक्य आहे. पण त्यातही एक प्रश्न आहे. मुलायमसिंग यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे कारण त्यांनी सरकार पाडायचे ठरवले तरी त्यांना त्यासाठी भाजपासारख्या मोठ्या गटाची गरज आहे. अर्थात ते या बाबत स्वतः पुढाकार घ्यायला तयार नाहीत. भाजपाने हे सरकार पाडावे आणि आपण त्या यात्रेत सहज सामील झाल्यासारखे सामील व्हावे असा त्यांचा प्रयत्न असणार.

भाजपाने ही ऑफर स्वीकारली नाही या मागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. २००८ साली केन्द्रातले हे सरकार पडत होते. पण मुलायमसिगांनी आपल्या तब्बल ३६ खासदारांची कुमक सरकारच्या मागे उभी केली आणि सरकार वाचवले. त्यावेळी भाजपाने मुलायमसिगांना सरकारला पाठींबा न देण्याविषयी विनवले होते पण मुलायमसिगांनी तेव्हा तर भाजपाला साथ दिलीच नाही पण उलट त्यांच्या पक्षाचे नेते अमरसिंग यांनी भाजपाच्याच खासदारांच्या घरी नोटांची बंडले नेऊन त्यांनाच फोडण्याचा प्रयत्न केला.

अशा मुलायमसिगांवर आता भाजपाने विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न गडकरी यांना पडलेलाच असणार. त्यांनी मुलायमसिगांच्या जाळ्यात न अडकण्याचे ठरवले हे बरेच झाले कारण मुलायमसिंग आता भरवशाचे नेते राहिलेले नाहीत. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत त्यांनी ममता बॅनर्जी यांना पुढाकार घ्यायला लावला आणि नंतर तोंडघशी पाडले. त्यांना कसलेच ठाम धोरण ठरवता येत नाही. ऐनवेळी त्यांनी पेरलेले विषारी बी उगवून येते आणि त्यांना आपला बेत ऐनवेळी बदलावा लागतो. आताही तसे झाले असते. किंबहुना गेल्या महिन्यात तसे घडलेही आहे.

Leave a Comment