महाराष्ट्र भाजपाचे नवे अध्यक्ष

महाराष्ट्र भाजपाच्या अध्यक्षपदी तुलनेने कमी वयाचे नेते नियुक्त झाले आहेत. त्यांनी आपल्या प्रशासकीय गुणांची चमक दाखवलेली आहे. वाकपटुत्वाचा अनुभव तर सारी मराठी जनता रोजच वृत्तवाहिन्यांवरून घेत असते. आता त्यांच्या संघटनकौशल्याचा कस लागणार आहे. त्याचा अनुभव अद्याप तरी आलेला नाही. त्यांनी आपल्या मतदारसंघात आपले संघटन चांगले केले आहे. कारण ते सलग तीन निवडणुकांत विधानसभेवर निवडून आले आहेत.   त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरूवातीला नगरसेवक आणि नागपूरचे महापौर म्हणून चांगले काम पाहिले आहे. 

आजवर महाराष्टाच्या भाजपात केवळ गोपीनाथ मुंडे यांनीच आपले संघटनकौशल्य दाखवले होते. त्यांनी अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याबरोबर महाराष्ट्रचा दौरा करून सात हजार गावांना भेटी दिल्या होत्या. तसेच त्यातल्या अनेक गावांत सभा घेऊन आपल्या वक्तृत्वाचेही दर्शन घडवले होते. त्यांनी या पदाचा कार्यभार सोडल्यापासून अन्य कोणीही तेवढ्या धडाडीने हे दायित्व निभावलेले नाही. आता फडणवीस यांनी महाराष्ट्र पिंजून काढला पाहिजे आणि भाजपाचा विस्तार करण्याचे काम केले पाहिजे.

पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर फडणवीस यांच्या नियुक्ती बाबत तीन दिवस चर्चा सुरू होती. त्या चर्चेच्या अंती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. ही निवड होताना पक्षात काही मतभेद झाले. गडकरी आणि मुंडे यांची काही नावांवरून रस्सीखेच झाली. शेवटी मुंडे यांची सरशी झाली. प्रदेशाध्यक्षपदावर गडकरी यांच्या पसंतीचा उमेदवार निवडला जाऊ नये याबाबत मुंडे आग्रही होते. त्यात त्यांना यश आले कारण फडणवीस हे गडकरी यांच्या पसंतीचे उमेदवार नाहीत. अर्थात या गोष्टी कठेही उघडपणे चचिल्या गेलेल्या नाहीत. पण सध्या गडकरी यांना पक्षात चांगले दिवस नाहीत या उलट मुंडे यांचा बॅड पॅच संपून ते आता पक्षात अपरिहार्य ठरायला लागले आहेत.

पक्षात नेत्यांना ऊन सावलीचा अनुभव घ्यावाच लागतो. मुंडे यांनी फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला आणि तो मानला गेला याचा अर्थ त्यांच्या शब्दाला पक्षात किंमत येत आहे असा होतो. कारण येणार्‍या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात पक्षाचे समर्थ नेतृत्व करील असा मुंडे यांच्या शिवाय कोणी नेता तयार झालेला नाही. आता तरी मुंडे अपरिहार्य आहेत. मुंडे दिल्लीला गेले पण त्यांना राज्यातले आपले सारे दोर कापता आले नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांची जागा घेण्यात तावडेही अपयशीच ठरले. आता राज्याचे नेते मुंडे आणि नवे प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांना पक्षाला निवडणुकीत चांगले यश मिळवून द्यावे लागणार आहे. या दुकलीला राज्यात चांगले यश मिळावे अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊ या. पण यशस्वी होणे फार अवघड आहे. कारण पक्ष फार मोठ्या कठीण स्थितीतून वाटचाल करीत आहे. या स्थितीची अनेक आव्हाने नव्या प्रदेशाध्यक्षांसमोर उभी आहेत.

भाजपा समोरची आव्हाने दोन प्रकारची असतात. यात शाश्वत आव्हान असते आणि दुसरे हंगामी असते. भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढत नाही ही या पक्षासमोरची मोठीच अडचण असते. या पक्षाचा पूर्वावतार म्हणजे जनसंघ हा तर समाजातल्या अगदीच वरच्या स्तरावरच्या लोकांचा पक्ष होता. तो १९७७ साली जनता पार्टीत विलीन करण्यात आला आणि १९८० साली बाहेर पडून भारतीय जनता पार्टी हा नवा पक्ष स्थापन झाला. पक्षाचा हा अवतार जनसंघापेक्षा अधिक समाजाभिमुख होता. म्हणूनच पक्षात मुंडे यांच्या सारखे नेते उदयाला आले. पक्षाची धोरणेही त्याला कारणीभूत ठरली. जनसंघाचा जनाधार काहींसा व्यापक झाला पण  तो वाढला आणि तिथेच थांबला. १९८० साली भाजपाच्या स्थापनेच्या वेळी समोर आलेल्या नव्या स्वरूपाजवळच भाजपाची वाढ खुंटली. पक्षाची वाढ करण्याचा फार गंभीर प्रयत्न झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्रच्या विधान सभेत ६० आमदार निवडून आणणे ही भाजपाची मर्यादा ठरली. भाजपा नेत्यांनी ती मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्नही केला नाही.

राज्यातली सत्ता काबीज करायची असेल तर स्वतःची ताकद वाढवली पाहिजे. भाजपाला ती वाढवता आली नाही.  राज्यातल्या शेतकर्‍यांना कोणीच  वाली नाही. विदर्भातले शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्यांना सरकार जबाबदार आहे असे भाजपाचे नेते  म्हणतात पण या परिस्थितीत भाजपाच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच हातपाय पसरायला लागली आहे. आज राज्यातल्या पाणी वाटपाचा प्रश्न गंभीर झाला आहे पण या वाटपात अन्याय होणार्‍या शेतकर्यांाना भाजपाने आधार दिलाय असे कधी घडलेले नाही. या विषयावर भाजपाची काही पर्यायी नीती आहे असे कधी दिसलेले नाही. शेतकरी वर्गात पक्ष वाढवण्याचा प्रयत्न पक्षाने कधी केलेला नाही. अर्थात हा भाजपाचा जुना प्रश्न आहे. आताही भाजपा-सेनेचे रिपब्लिकन पार्टीशी संगनमत आहे पण ही युती रिपाइं कार्यकर्त्यांशी योग्य समन्वय साधू शकलेली नाही. त्यामुळे दलित मतांची निदान काही प्रमाणात तरी पक्षाच्या मतांत भर पडायला हवी होती ती पडली नाही.