किती वेळा माफी मागणार?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळग्रस्त जनतेची क्रूर चेष्टा करताना जे उद्गार काढले त्याबद्दल महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जनतेची माफी मागितली आहे. अजित पवार यांची अशी माफी मागण्याची कितवी वेळ आहे हे लिहून ठेवावे लागणार आहे. परंतु त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे असे उद्गार अनेक वेळा काढले आहेत आणि ते काढून सुद्धा चूक लक्षात न आल्यामुळे किंवा तेवढा प्रांजळपणा नसल्यामुळे दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली नाही. एवढे करून सुद्धा हा अविचारी तोंडाळ माणूस अजूनही महाराष्ट्राचा उपमुख्य मंत्री आहे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी गोष्ट आहे.

श्री. शरद पवार यांनी आपल्या या पुतण्यासाठी स्वतः जनतेची माफी मागितली आहे. परंतु अजित पवार यांचे हे उद्गार एवढे हीन अभिरुचीचे, मस्तवालपणाचे आणि अविवेकीपणाचे आहेत की त्यांना या पदावर एक क्षणभर सुद्धा ठेवता कामा नये. अर्थात आपल्या पुतण्याने दुष्काळग्रस्त जनतेचा असा घोर अपमान केलेला काकांना चालत असावा. म्हणून अजून तरी त्यांनी पुतण्याला खुर्ची सोडायला सांगितलेले नाही. हे उद्गार स्वतः शरद पवार यांनी काढलेले नाहीतच, परंतु ते या उद्गारावरून अजित पवार यांचा राजीनामा घेत नसतील तर या उद्गाराला त्यांचाही पाठींबा आहे असेच मानावे लागेल. महाराष्ट्रातल्या जनतेला पाण्याऐवजी लघवी पाजण्याची भाषा करणे हा अपराध माफी मागण्याएवढा किरकोळ आहे असे शरद पवारांनाही वाटत असावे. यावरून ते सुद्धा दुष्काळाबाबत किती गंभीर आहेत हे लक्षात येते.

अजित पवारांनी जे उद्गार काढले ते काही दैनिकांनी छापले नाहीत. कारण छापण्यासाठी सुद्धा ते शब्द वापरणे अनेकांना अनुचित वाटले. राज्याचा उपमुख्यमंत्री एवढा बेताल कसा बोलू शकतो? किंवा एवढे बेतालपणे बोलू नये याचीही ज्याला अक्कल नाही, अशा माणसाला उपमुख्यमंत्री करतात तरी कसे? याचे आश्चर्य वाटते. अर्थात शरद पवारांचा पुतण्या असणे हे त्यांचे खरे क्वालिफिकेशन आहे आणि ते जवळ असल्यावर आपल्याला कोणाचीच पर्वा करण्याची गरज नाही, अशी अजित पवार यांची मग्रुरी आहे. त्यामुळेच आपण काहीही बोललो तरी काहीच होणार नाही अशा भ्रमात ते वावरत असतात.

गेल्या एका वर्षात त्यांनी बेताल बोलण्याच्या बाबतीत विक्रमच केला आहे. त्यातल्या किमान दोन वेळा तरी त्यांच्या या वाचाळपणामुळे खुद्द शरद पवार यांना जनतेची माफी मागावी लागली आहे आणि पत्रकारांपुढे दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे. हे अजित पवार गेल्या आठवड्यामध्येच आपणच पुढे मुख्यमंत्री होणार आहोत, असेही सांगून गेले. मुळात त्यांच्या बडबडीमुळे त्यांचे उपमुख्यमंत्रीपद तरी राहते की नाही, याविषयी शंका आहे. मग अशा माणसाला जर मुख्यमंत्री केले तर तो महाराष्ट्रावरचा कलंक ठरल्याशिवाय राहणार नाही.

नेते जनतेच्या कल्याणासाठी त्याग करण्याचा आव आणतात पण प्रत्यक्षात तसा त्याग करीत नाहीत. त्यामुळे जनता कंगाल होत आहे आणि नेतेच गबरगंड होत आहेत. या गोष्टी तर उघडच दिसत आहेत. त्याची चर्चा सुरू झाली की ही मंडळी विषयांतर करून त्या चर्चेला ब्राह्मण-मराठा, दलित-सवर्ण किवा ग्रामीण-शहरी असा रंग देतात आणि आपली सुटका करून घेतात. जनतेशी प्रतारणा करण्याचा त्यांचा कावा सहीसलामतपणे खपून जातो. हे टगे पुन्हा खाबुगिरी करायला मोकळे. समाजात भेद निर्माण करून दिले की आपले पाप झाकते याची खात्री असल्याने सतत खायला सोकावलेल्या या गुंडांना या खात्रीपोटी मस्ती आली असून त्यांची मजल दुष्काळग्रस्त लोकांना पाण्याच्या ऐवजी लघवी पाजण्याच्या गोष्टी बोलण्यापर्यंत गेली आहे.

सत्तेने पिसाट झालेले अनेक नेते आले आणि गेले पण एवढा अविवेक कधी पाहिला नाही आणि ऐकलाही नाही. खरोखरच फ्रान्सच्या त्या वेड्या राणीच्या यादीत अजित पवार यांनी आपले नाव नोंदवून ठेवले आहे आणि इतिहासात आपल्या नावाची नोंद घ्यायला भाग पाडले आहे. हे सारे प्रकार शिवछत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणार्याा लोकांकडून चालले आहेत. ज्यांनी रयतेच्या भाजीच्या  देठालाही हात लावलेल्या मस्तवालांचे डोळे काढले होते.

खरेच अजित पवार यांनी हा घाणेरडा प्रकार का केला असेल आणि त्यांच्या मनात या निमित्ताने झालेली विकृत  मनःप्रक्रिया काय असेल ? मोबाईल फोनवरून जे संवाद होतात त्यांचे मागचे रेकॉर्ड तपासता येते तसे अजित पवारांच्या गचाळ मेंदूत या भाषणापूर्वी कोणती प्रक्रिया झाली होती याचा मागोवा घेता आला तर पहायला पाहिजे. लोक दुष्काळाने मरत असतील आपल्याला त्याच्याशी काही देणे घेणे नाही आपण या संधीचा उलट फायदा घेऊन आपली तुंबडी भरली पाहिजे अशी त्यांची विचारसरणी आहे. ते खाजगीत बोलताना तसे बोलूनही दाखवत असतील. लोक काय मूर्खच आहेत. त्यांना आणखी मूर्ख बनवले पाहिजे. भाषणात मात्र त्यांच्या नावाने गळा काढला पाहिजे. भाषणात कळवळा आणि खाजगीत टिंगल टवाळी अशी ही नीती आहे. यातली टिंगल टवाळी खरी आहे. भाषणातला कळवळा खोटा आहे.

दारू पिणार्‍या