सातारा- पंधरा दिवसापासून बेपत्ता असलेले माजी आमदार लक्ष्मण माने हे त्यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे सोमवारी सातारा तालुका पोलिस ठाण्यात शरण आले. शरण आल्यानंतर काही तासांतच त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सातारा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अचानक तब्येत बिघडल्याने माने यांना मंगळवारी सकाळी उपचारासाठी सातारा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शारदाबाई पवार आश्रमशाळेतील सात महिलांनी माने यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. या संस्थेचे माने हे कार्याध्यक्ष आहेत. पंधरा दिवसापासून माने बेपत्ता होते. त्यांनी सातारा कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला. त्यानंतर सोमवारी चार वाजण्याच्या सुमारास माने तालुका पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यावेळी पोलीसानी त्यांना ताब्यात घेतले.
अटकेनंतर बोलताना माने म्हणाले,’ मी २००५ पासून आजारी आहे. त्यामुळे हे सर्व आरोप म्हणजे माझ्यावरच झालेला बलात्कार आहे. या आरोपांमागे हरी नरके , बाळकृष्ण रेणके, पल्लवी रेणके, व्यंकप्पा भोसले, शिवाजी भोसले, आनंदा देशमुख, विजय कदम, जामदार ही मंडळी आहेत ‘. त्यांनी स्वतःविरोधातील तक्रारींच्या सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.