अजित पवारांना हटवा: विरोधकांची आग्रही मागणी

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेताल विधानाने संतप्त झालेल्या विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक रूप धरण केल्याने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मंगळवारचे कामकाज ठप्प झाले. पवारांनी सोमवारी माफी मागूनही विरोधक समाधानी नसून त्यांनी राजीनामा द्यावा; अथवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी त्यांची आग्रही मागणी आहे. मंगळवारी सकाळीच विधानभवनाच्या आवारात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घेराव घालून विरोधकांनी अजित पवारांच्या हकालपट्टीची मागणी केली.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि विजेचा तुटवडा या दोन्ही ‘राष्ट्रवादीच्या अखत्यारीत असलेल्या प्रश्नांवरंच पवार यांनी जाहीर सभेत असंवेदनशील विधाने केल्याने त्यांच्यावर सोमवारी विधिमंडळ आणि प्रसारमाध्यमांसमोर माफी मागण्याची वेळ आली. ‘आपण ही राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली;’ असे दादांना कबूल करावे लागले. इतकेच काय; केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जनतेची माफी मागण्याची वेळ आली.

मात्र एवढे होऊनही या प्रकरणी विशेषत: दुष्काळी जनता अजित पवारांवर संतप्त आहे. काही ठिकाणी अजित पवार यांचे पुतळेही जाळण्यात आले. विरोधकांच्या हातीही पवारांच्या या वक्तव्याने आयते कोलीत मिळाले असून विरोधक त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत.

दरम्यान; अजित पवारांच्या अश्लाघ्य विधानाचा निषेध करण्यासाठी दुष्काळात होरपळणाऱ्या जालना येथील काही कार्यकर्त्यांनी एका स्वच्छता गृहाला पवारांचे नाव देऊन आपला संताप व्यक्त केला.