राजीव गांधींवर आरोप करणारी केबल विकिलिक्सने फोडली

नवी दिल्ली: सत्तरच्या दशकात झालेल्या लढाऊ विमान खरेदी प्रकरणी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मध्यास्ताची भूमिका निभावाल्याची शक्यता वर्तविणारी केबल विकिलिक्सने उघड केली आहे. कॉंग्रेस पक्षाने विकीलिक्सच्या विश्वासार्हतेबाबत शंका व्यक्त करून हे आरोप फेटाळले असून प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने याबाबत खुलाशाची मागणी केली आहे.

सत्तरच्या दशकात साब स्कँडिया या कंपनीकडून विगेन लढाऊ विमानांची खरेदीसाठी भारताशी वाटाघाटी करण्यात आल्या. मात्र भारतीय वायुदलासाठी ब्रिटीश बनावटीच्या जेग्वार विमानांची निवड करण्यात आली. त्या काळात इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या; तर राजीव हे व्यावसायिक वैमानिक होते. या व्यवहारात राजीव यांनी कंपनीसाठी मध्यस्थी करून त्यांना त्याबाबत मोबदला मिळाला असावा; अशी शक्यता वर्तविणारी स्वीडनच्या वकिलातीची सन १९७५ मधील केबल विकिलिक्सने प्रसिद्ध केली आहे.

राजीव यांच्यावर बोफोर्स तोफांच्या खरेदी बाबतही आरोप झाले होते. या आरोपांमुळे त्यांना सत्तेवरून पाया उतारही व्हावे लागले.

या केबलमध्ये दोन माजी पंतप्रधानांवर आरोप झाले असल्याने हे गंभीर प्रकरण आहे. या बाबत कॉंग्रेस पक्षाने पूर्ण पारदर्शकता ठेऊन याबाबतची सर्व कागदपत्रे खुली करावी अशी मागणी भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.