फाशीवर जाणारी देशातील पहिली महिला सोनिया पुनिया

नवी दिल्ली, दि. ८ – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयेची याचिका फेटाळल्यानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फाशी देण्यात येणार आहे.  सोनिया असे या महिलेचे नाव असून, तिचा पती संजीव यालाही याप्रकरणी फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आली आहे. सोनियाने आपल्या कुटुंबातील आठ लोकांची हत्या केली होती. यामध्ये आई-वडिलांचादेखील समावेश आहे. फाशी देण्याची तारीख हिसारच्या सत्र न्यायालयाकडून निश्चिित करण्यात येणार आहे.

हरियाणामधील बहुचर्चित रेलूराम पुनिया परिवार हत्याकांडात सोनिया आणि तिचा पती संजीवला हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाकडून फाशीची शिक्षा झाल्यानंतर दोघांनी राष्ट्रपतींकडे दयेची याचना केली होती.

सोनिया आणि संजीव सध्या अंबाला येथील तुरुंगात आहेत. हरियाणाचे माजी आमदार रेलूराम पुनियांसहित त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांची हत्या 23 ऑगस्ट 2001 रोजी करण्यात आली होती.