अन्नधान्याच्या किंमती गरीबांमुळे वाढल्या – गव्हर्नर सुब्बाराव

बेंगलोर, दि.८ – पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतीय शेतकर्‍यांची थट्टा उडवल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी त्यापुढची पायरी गाठत, देशातील अन्नधान्याच्या टंचाईला ग्रामीण भागातील गरीबांना जबाबदार ठरवले आहे. येथे चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका वार्षिक अधिवेशनात बोलताना ते म्हणाले की, देशात झालेल्या आर्थिक क्रांतीनंतर देशाच्या ग्रामीण भागातील गरीबांकडे कधी नव्हे ते जास्तीचा पैसा आला. त्यामुळे या लोकांनी आपला बहुतांश पैसा खाण्या-पिण्यासाठी खर्च करायला सुरुवात केली. त्यामुळे दूध, अंडी, मांस याचे दर गगनाला भिडले आहेत.

हे अजब तर्कट मांडताना सुब्बाराव पुढे म्हणाले की, मी हे विनाकारण बोलत नसून त्याविषयीची मौल्यवान आकडेवारी आमच्याकडे आहे. गेल्या पाच वर्षांत दरवर्षी ग्रामीण गरीबांच्या उत्पन्नात किमान 20 टक्के वाढ होत आहे. त्यामुळे हे लोक आपल्या खाण्याच्या सवयी बदलत आहेत. 

योजना आयोगाचे प्रमुख मॉण्टेकसिंग अहलुवालीया यांनी 32 रुपये रोज कमावणारा माणूस गरीब नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर देशभर वादळ निर्माण झाले होते. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दरमहा 600 रुपये एका कुटुंबाला पुरेसे असल्याचे म्हटले होते. याविषयी बोलताना सुब्बाराव म्हणाले की, या दोन्ही विधानांची सत्यता पडताळून पाहण्याची तसदी कोणीही घेतली नाही, हे दुर्दैव आहे.