अमेरिकी औषध कंपनीला न्यायालयाचा दणका

नवी दिल्ली: नोव्हार्टिस या औषध कंपनीने पेटंटसाठी दाखल केलेली याचिका काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. आता मर्क शार्प अँड डोमे (एमएसडी) या अमेरिकी औषध कंपनीला पेटंटप्रकरणी दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या भारतीय कंपनीला झिटा आणि झिटा-मेट या मधुमेहावरील औषधांची निर्मिती आणि विपणन करण्यापासून रोखण्याची मागणी एमएसडीने आपल्या याचिकेत केली होती.
तथापि, न्या. राजीव सहाय एंडलॉ यांनी या बहुराष्ट्रीय कंपनीची याचिका फेटाळली आहे.

न्यायालयाने पुरावे दाखल करण्यासाठी आणि इतर कायदेशीर प्रक्रियेसाठी कंपनीची मुख्य याचिका मात्र प्रलंबित ठेवली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण निराश असून सर्व पर्यायांचा विचार सुरू असल्याची प्रतिक्रिया एमएसडीने दिली आहे. बाजारात एमएसडीच्या जानुविया या मधुमेहावरील औषधाच्या सात गोळयांची किंमत ३०० रुपये आहे; तर ग्लेनमार्कचे औषध ३० टक्कयांनी स्वस्त आहे. ग्लेनमार्कने बौद्धीक हक्क संपदा कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा करत या कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती.