राज्यपालांनी संजय दत्तसाठीचा माफी अर्ज गृहविभागाकडे पाठविला

मुंबई दि.१ – समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिग आणि खासदार अभिनेत्री जया प्रदा यांनी संजय दत्त याची शिक्षा माफ करावी यासाठी राज्यपाल के. शंकरनारायणन याच्याकडे केलेले माफी अर्ज राज्यपालांनी पुढील विचारासाठी राज्याच्या गृहमंत्रालयाकडे पाठविला असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमरसिंग आणि जयाप्रदा यांनी गेल्या मंगळवारीच हा अर्ज राज्यपालांकडे दिला होता. त्यानुसार अमरसिंग यांनी संजय हा दहशतवादी नसल्याचे सुप्रीम कोर्टानेही मान्य केले असल्याचे म्हटले असून या घटनेला आता २० वर्षे लोटली आहेत आणि संजयला दोन लहान मुले आहेत, तो महात्मा गांधीविषयी बोलतो असे प्रतिपादन करून त्याची शिक्षा माफ केली जावी अशी मागणी केली आहे. संजय दत्त यानेही कांही काळ समाजवादी पक्षात काढला आहे तेव्हाही त्याचे राजकीय करिअर घडावे यासाठी अमरसिंग यांनी विशेष प्रयत्न केले होते.

दरम्यान माजी न्यायाधीश आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेज काटजू यांनीही संजयला शिक्षा माफ करावी असा अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केला असून कलम १६१ खाली माफी मागण्याच्या असलेल्या अधिकारातून हा अर्ज त्यांनी केला आहे. संजयची शिक्षा माफ व्हावी यासाठी अन्य आठ जणांनीही अर्ज केले असून हे सर्व सर्वसामान्य नागरिक आहेत पैकी एक सिंगापूरचा रहिवासी आहे असेही समजते.

Leave a Comment