कॉसमॉस बँकेची ११३ कोटीची कर्जे काढून टाकण्याचा निर्णय

पुणे ३० : सहकारी क्षेत्रातील आघाडीच्या कॉसमॉस सहकारी बँकेने आज झालेल्या विशेष सर्वसाधरण सभेत ११३ कोटी रुपयांची वसूल न होणारी बुडीत कर्जे ताळेबंदातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. आजच्या सभेस दीड हजारावर भागधारक, कर्जदार आणि ठेवीदार उपस्थित होते. काही सजग भागधारकांनी अशा प्रकारे कर्जे माफ करण्यास आक्षेप घेऊन ती कशी वसूल करता येतील याबाबत संचालक मंडळाला सूचनावजा कानपिचक्या दिल्या.

एकूण ११३ कोटी रुपयांपैकी केवळ ४० कोटी रुपयांची कर्जे ही थेट कॉसमॉस बँकेशी निगडीत आहेत असे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले. इतर कर्जे ही बँकेने ताब्यात घेतलेल्या इतर सहकारी बँकांची आहेत. २००५-०६ मध्ये अशीच कर्जे ताळेबंदातून वगळण्यात आली हो ती मात्र त्यापेकि ४० कोटी रुपये नंतर वसूल झाले होते असे सभेत सांगण्यात आले. ही प्रक्रिया रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या नियमांच्या चौकटीत केले जात आहे.

बँक भक्कम पायावर उभी असून आगाऊ कर भरणारी तसेच वेगाने विस्तार करणारी बँक असल्याचे यावेळी अध्यक्ष कृष्कुमार गोयल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की कर्जे ताळेबंदातून वगळली असली तरी त्यांची वसुली होण्याची कार्यवाही यापुढेही चालू राहील. बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत ज्या वावड्या हितसंबंधी लोकाकांकडून उठविल्या जात आहेत त्याचे निराकरण या सभेत भागधारकांनी दाखविलेल्या विश्वासाने झाले आहे.