दिल्ली रेप प्रकरणातील आरोपीची शिक्षक पुरविण्याची मागणी

नवी दिल्ली दि.२७ – केवळ देशभरातच नव्हे तर जागतिक पातळीवरही पडसाद उमटलेल्या दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीने त्याला भारतीय वायू सेनेकडून मुलाखतीला बोलावणे आले असल्याने तुरूंगात मुलाखतीच्या तयारीसाठी मार्गदर्शक किवा शिक्षक पुरविले जावे अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.

दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणात पाच आरोपींवर खटला चालविला जात आहे. त्यातील एक आरोपी विनय शर्मा याच्या वकीलांनी जलद गती न्यायालयाकडे अर्ज सादर केला आहे. त्यानुसार विनय शर्मा याला भारतीय वायू सेनेतील सी ग्रेड कॅटॅगरीतील भरतीसंदर्भात मुलाखतीचे पत्र मिळाले आहे. मुलाखतीसाठी सामान्य ज्ञान आणि अन्य तयारी करणे आवश्यक असून त्यासाठी योग्य मार्गदर्शक किवा शिक्षक दिले जावेत. ही नोकरी मिळाली तर विनय चांगले आयुष्य व्यतीत करू शकेल, त्याला चांगला पगार मिळेल आणि नोकरीनिमित्ताने देशसेवेची संधीही त्याला मिळेल असेही या अर्जात म्हटले गेले आहे. विनय हा त्याच्या कुटुंबातील एकमेव मिळवता आहे.

जलद गती न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश खन्ना यांनी या अर्जासंबंधात दिल्ली पोलिसांचे म्हणणे मागविले असल्याचे समजते. त्यामुळे या खटल्याची सुनावणी २८ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.