पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) – रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळातील सदस्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे एकांकिकांच्या संहितेला मान्यता मिळविण्यासाठी सहा-सहा महिने वाट पहावी (वेटींग) लागत आहे. मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीला 47 सदस्यांपैकी केवळ 7 जणांनी हजेरी लावली होती. या बैठकीत सहा महिन्यांपासून मान्यतेसाठी अडकून पडलेल्या संहितांना संबंधितांच्या अभिप्रायाशिवाय मान्यता देण्यात आली.
एकांकिकांना संबंधितांच्या अभिप्रायाशिवाय मान्यता: रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचा निष्काळजीपणा
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे आहेत. प्रशांत दामले, मधु कांबीकर, सविता मालपेकर, राम जाधव, मैय्याज शेख, अशोक हांडे, आशा काळे, लिला गांधी, संजय पवार, टेक्सास गायकवाड, कमलाकर नाडकर्णी, वामन केंद्रे, जयंत पवार, प्रेमानंद गज्वी यांच्यासह 47 जण या मंडळाचे सदस्य आहेत.
मंडळाकडे दर महिन्याला किमान दहा एकांकिका मान्यता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येतात. मंडळाकडे संहिता आल्यानंतर त्या वाचनासाठी या सदस्यांकडे जातात. प्रत्येक सदस्याला विभागून या संहिता देण्यात येत असतात. या सदस्यांनी संहितेचे वाचन करून आपला अभिप्राय मंडळाच्या दर महिन्याला होणार्या बैठकीत देण्याची आवश्यकता असते. मात्र, सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे एकंकिका लेखकांना मान्यता प्रमाणपत्रासाठी सहा महिने वाट पहावी लागत आहे.
कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या बैठकीस अध्यक्ष म. मुं. शिंदे यांच्यासह केवळ सात सदस्य उपस्थित होते. या बैठकीत नऊ एकांकिकांना मान्यता देण्यात आली. मात्र, यापैकी एकाही संहितेवर संबंधित सदस्यांकडून अभिप्राय आलेला नव्हता. संबंधित एकांकिका लेखकांनी सहा महिन्यांपूर्वी अर्ज सादर केलेले असल्यामुळे या संहितांना संबंधित सदस्यांच्या अभिप्रायाशिवाय मान्यता प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
