नेताजींचे संकेत आणि भाकिते

राजकारणात नेहमीच ‘त’ म्हणजे ताक भात असतेच असे काही नाही. कोणी काही सूचक वाटावे असे बोलले की  त्यावरून आपण राजकारणात नव्या समीकरणाची नांदी म्हटली जातेय असे समजलेच पाहिजे असे नाही. तसे काही असण्याचे कारण नाही पण तसे होते हे मात्र खरे. विशेषतः शरद पवार आणि मुलायमसिंग यादव यांच्यासारखे नेते काही बोलले की पत्रकार त्यांच्या बोलण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयास सुरू करतात. त्यातून ते आता कोणती चाल खेळणार आहेत याचे तर्क केले जातात. मग ते तशा चाली खेळतील तेव्हा राजकारण कसे कसे बदलेल याचे अंदाज बांधणे सुरू होते. त्यातून असे काही निष्कर्ष निघतात की, जे ते उद्गार काढणार्याय नेत्याच्या डोक्यातही नसतात.

अशा निष्कर्षाप्रत येताना ते कथित राजकीय समीक्षक आणि निरीक्षक राजकारणातल्या अनेक वास्तवांचे भानही ठेवत नाहीत. परिणामी त्यांचे राजकीय निदान चुकले आहे असे नंतर लक्षात येते पण तोपर्यंत त्यांनी पूर्वी केलेली ती भविष्यवाणी खोटी ठरली आहे याचे कोणालाच स्मरण नसते. मुळात त्या राजकीय निरीक्षकांनाही आपण वेळोवेळी काय भाकिते वर्तवली आहेत हे लक्षात नसते. ती भाकिते चुकीची ठरली तरी ते नव्या दमाने चुकीची भाकिते करत राहतात आणि ती पुन्हा पुन्हा  चुकीची ठरत असतात.

अशा राजकीय पंडितांच्या बुद्धीला नेहमीच काहीतरी चारा मिळत राहतो कारण नेत्यांना सतत काही तरी बोलावेच लागते. आता ती जबाबदारी मुलायमसिंग यादव यांच्यावर पडली आहे. त्यांनी चक्क महाराष्ट्रात येऊन वाळव्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शरद पवार हेही बसणार होते. पवारांची प्रकृती बिघडली आणि ते या कार्यक्रमाला न येता  पुण्याला गेले. अर्थात त्यावरूनही अनेक नवे नवे अर्थ काढण्याचे प्रयत्न झालेच  पण त्यांची प्रकृती खरेच बिघडली असल्याचा खुलासा झाला.

अर्थात प्रकृती बिघडल्याचे सांगणे हाही एक डाव किवा पेच असू शकतो. तो मागे अजित पवार यांनी टाकला होता आणि ते बडोद्यातल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात अनुपस्थित राहिले होते. तेव्हा ती त्यांची गरज होती कारण त्यांना तेव्हा काकांनी माफ केलेले नव्हते. वाळवा येथे नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला मुलायमसिंग आले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शरद पवार यांची प्रशंसा केली. आगामी काळात पवारांच्या पाठींब्याशिवाय कोणाचही सरकार बनणे शक्य नाही असे ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशातल्या एका कार्यक्रमात बोलताना अडवाणी यांची स्तुती केली होती.

त्यांनी केलेली या दोघांची स्तुती आणि सध्याची केन्द्रातली  राजकीय स्थिती यावरून काही राजकीय पंडितांनी अनेक तर्क लढवले आहेत. त्या तर्कांना सपाच्या अन्य नेत्यांनीही बळकटी दिली. त्यांनी वाजपेयी यांचे सरकार आताच्या संपु आघाडीच्या सरकारपेक्षा चांगले होते असे म्हटले. मुलायमसिंग अडवाणी यांची स्तुती करतात याचा अर्थ ते आता भाजपाच्या जवळ सरकत आहेत. म्हणजे येत्या निवडणुकीत भाजपा आणि सपा यांची युती होण्याची संभावना आहे. दुसरया बाजूला मुलायमसिगांनीच समान विचार बाळगणार्याप पक्षांनी एकत्र आले पाहिजे असेही आवाहन केले आहे. याचा अर्थ असा की, त्यांचा  तिसर्याा आघाडीची बांधणी करण्याचा विचार आहे.

या दोन तर्काची बेरीज करून नवे समीकरण तयार झाले. केन्द्रात तिसरी आघाडी बळकट होणार आणि ती भाजपाशी हातमिळवणी करून काँग्रेसला हटवण्याचा प्रयत्न करणार. या तिसर्यात आघाडीच्या प्रयासात शरद पवारही अग्रभागी राहणार कारण ते मुलायमसिंग यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसायला तयार झाले होते. या तर्काला आणखी एक ढिगळ जोडण्याची संधी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिली. त्यांनी दिल्लीत  शक्तिप्रदर्शन केले आणि भाजपापासून दूर जात असल्याचे सूचित केले. त्याच दिवशी द्रमुकने केन्द्र सरकारचा पाठींबा काढून घेतला. तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी, तरीही सरकार पडणार नाही, अशी हमी दिली पण त्यांच्या आधी नितीशकुमार यांनीच सरकार भक्कम राहील अशी ग्वाही दिली. मग आमचे राजकीय पंडित त्यांचीही कुंडली मांडून बसले. आणि भविष्य सांगते झाले की, नितीशकुमार काँग्रेसच्या जवळ सरकत आहेत. म्हणजे काँग्रेसचे नेते मुलायमसिंग यांच्या ऐवजी नितीशकुमार यांना जवळ करणार.

आता असे सगळे तर्क करताना या लोकांना हेही कळत नाही की, बिहारात  भाजपाचे बळ जास्त की काँग्रेसचे ? नितीशकुमार यांना तिथे काँग्रेसच्या गळ्यात गळा घालणे कितपत परवडणार आहे ? मुलायमसिंग यादव यांनी कसल्या तरी संदर्भात ‘अडवाणी’ असा शब्द उच्चारला तरी आपण सपा आणि भाजपाची युती होणार असे म्हणत सुटतो पण त्याचा उत्तर प्रदेशातल्या मुस्लिम मतदारांवर काय परिणाम होत असतो हे काय मुलायमसिंग यांना कळत नाही का? शरद पवार तिसऱ्या आघाडीच्या फंदात पडून काय मिळवू शकतील ? राज्यात सत्ता प्राप्त करून देणार्या् काँग्रेसची साथ ते सोडतील आणि बिनभरवशाच्या तिसऱ्या आघाडीच्या नादाला लागतील एवढे काय पवार राजकारणात नवखे आहेत की काय ? या गोष्टी विचारात घेतल्या म्हणजे त्या नव्या समीकरणाची  भाकिते करणार्याा समीक्षकांचा उथळपणाच दिसतो.