गर्भलिंग निदान करून गर्भपात करणार्याज बदमाष डॉक्टरांची टोळी केवळ एका राज्यातच नव्हे तर दोन-तीन राज्यांमध्ये कार्यरत आहे. विशेषतः महाराष्ट्र – कर्नाटक आणि महाराष्ट्र – गुजरात अशा सीमा भागांतून अशा डॉक्टरांच्या टोळ्या आणि त्यांचे एजंटस् कार्यरत असल्याचे आढळले आहे. महाराष्ट्राच्या नंदूरबार जिल्ह्यातील शहादा हा तालुका गुजरातच्या सीमेवर येतो आणि या सीमेवरून महाराष्ट्रातील अनेक जोडपी गुजरातेतील काही विशिष्ट डॉक्टरांकडे जाऊन गर्भलिंग निदान करून घेऊन गर्भपात करून घेतात. म्हणजे डॉक्टर गुजरातमध्ये असतो पण ग्राहक मात्र महाराष्ट्रातला असतो. साधारणतः या प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांचे लक्ष राज्यातल्या ग्राहकांकडे असते. मात्र परराज्यातून आलेल्या ग्राहकांकडे त्यांचे लक्ष नसते. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन गुजरातेतील काही डॉक्टर्स महाराष्ट्रातल्या महिलांवर हे अवैध उपचार करतात.
गर्भलिंग निदान टोळी अनेक राज्यात कार्यरत
ही प्रवृत्ती उघड करण्यासाठी महाराष्ट्रातील लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख डॉ. वर्षा देशपांडे यांनी अशा आंतरराज्य टोळीचे स्टिंग ऑपरेशन करण्याचा निर्धार केला. शहादा तालुक्यातील एका आदिवासी महिलेला सुरत या गुजरातेतील शहरामध्ये लिंगनिदान करून घेण्यासाठी पाठवले. सदर महिलेने आणि तिच्या पतीने आधी सुरत शहरातल्या कैलास जाधव या कार्यकर्त्याच्या मदतीने प्रिया हॉस्पिटल या रुग्णालयात जाऊन तिथल्या डॉक्टरशी चर्चा केली. आपली सोनोग्राफी करून पोटात मुलगी आहे की मुलगा आहे हे सांगावे, अशी विनंती त्यांनी तिथल्या डॉक्टरला केली. हे करताना त्यांच्या सोबत एक एजंट होताच. परंतु या दवाखान्यात त्यांना लिंगनिदान केले जात नाही, असे सांगण्यात आले.
त्यावर हे सारे लोक केतन झरिवाला यांच्या वाणी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे सुरुवातीला त्या डॉक्टरने अल्ट्रासोनोग्राफी करत नसल्याचे सांगून त्यांना टाळले. परंतु नंतर चर्चा झाली आणि १४ हजार रुपयांत मुलगा की मुलगी हे सांगण्यास डॉक्टर तयार झाला. त्याने अल्ट्रासोनोग्राफी करून मुलगी असल्याचे सांगितले. त्यावर त्या आदिवासी महिलेने गर्भपात करण्याची मागणी केली. मात्र ती महिला २३ आठवड्यांची गरोदर असल्यामुळे डॉक्टरने गर्भपातास नकार दिला. पण दरम्यानच्या काळात त्याने लिंगनिदान करून त्या बाईच्या पोटात मुलगी असल्याचे सांगितले होते आणि कायद्याचा भंग केला होता. त्यामुळे दवाखान्यात लपून बसलेल्या पोलिसांनी आणि दक्षता पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली असे समजते.
