पुणे, दि. 25 (प्रतिनिधी) – डिझेलचे दर सतत वाढत असले व नुकतीच कर्मचार्यांचे वेतन वाढले असले तरी सध्या तरी प्रवासी भाडेवाढ करणार नाही. तसेच भविष्यात बीओटी तत्त्वावर काही स्थानके व व्यापारी संकुले बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे दिली.
एस टी प्रवासी भाड्यात वाढ नाही: एस.टी महामंडळाची ग्वाहीं
पुण्यातील बसस्थानकांची पाहणी करून गोरे यांनी एसटी कामगारांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी विभाग नियंत्रक अशोक जाधव, स्वारगेटचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक विजयकुमार दिवटे आदी यावेळी उपस्थित होते. कामगारांचा वेतन करार लवकरच करण्यात येईल. कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कराराबाबत बैठक होणार आहे. करारापोटी दर वर्षी सरासरी 417 कोटी रुपये जादा लागतील. प्रवासी कर कमी करण्याचा, टोल रद्द करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डिझेल दरवाढीचा दरमहा 20 कोटींचा जादा बोजा पडत आहे. शासनाकडून 1680 कोटी रुपये येणे आहे. ते पैसे मिळतीलही, पण पुढे खर्च कसा करायचा ही चिंतेची बाब असल्याचे गोरे यांनी सांगेतले.
भाडेवाढीनंतर प्रवासी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा अनुभव लक्षात घेता भाडेवाढ करण्याची मानसिकता सध्या नाही, असे सांगताना श्री गोरे म्हणाले यंदा 100 कोटी रुपये उत्पन्न घटले आहे. त्यामुळे प्रवासी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. बससेवा ही प्रवाशांसाठी आहे, हे कामगारांनीही विसरू नये. नवीन ड्रायव्हर भरती सुरू असून, 15 एप्रिलपर्यंत ते रुजू होतील, असेही त्यांनी नमूद केले. रत्नागिरी, अकोला, औरंगाबाद, नाशिक रोड, म्हसवड, पनवेल आदी ठिकाणी बीओटी तत्त्वावर बसस्थानक उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या निविदा काढण्यात आल्याची माहिती गोरे यांनी दिली. आर. सी. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
