शरद पवारांची प्रकृती बिघडली;विश्रांतीचा सल्ला

सांगली- समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्यासोबत पवार रविवारी एकाच व्यासपीठावर येणार होते. केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने सांगली येथे आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अचानक शुगर लेव्हल कमी झाल्याने डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असल्याचे समजते.

क्रांतीवीर पद्मभूषण नागनाथअण्णा नायकवडी यांचा पहिला स्मृतीदिन नुकताच झाला. नायकवडी यांची कर्मभूमी असलेल्या सांगलीत त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ वाळवा तालुक्यातील किसन अहिर विद्यापीठाच्या प्रांगणात आज होणार होता.याच कार्यक्रमात शरद पवार व मुलायम सिंह एकत्र येणार होते. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ‘डार्क हॉर्स’ ठरू शकणारे शरद पवार आणि मुलायम सिंह यादव हे दोन बडे नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने नव्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

पवारांच्या आजारपणामुळे या सर्व चर्चा थांबल्या आहेत. प्रकृती अचानक बिघडल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला असून डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचे समजते.