हवामानाच्या नोंदीसाठी नवीन यंत्रणा विकसित

मुंबई – हवामानाच्या नोंदीसाठी आता नव्याने हवामान केंद्राने ‘ऑब्झव्‍‌र्हेटरी ऑटोमेशन: हँड हेल्ड डेटा लॉगर’ यंत्रणा विकसित केली आहे. यापूर्वी भारनियमनामुळे राज्यभरातील विविध निरीक्षण केंद्रांवरून हवामानाच्या नोंदी मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रात वेळेत नोंदवल्या जात नव्हत्या. पण आता नवीन यंत्रणेमुळे हे शक्य होणार आहे.जागतिक हवामान दिनानिमित्त शनिवारपासून मुंबई, डहाणू, कोल्हापूर, महाबळेश्वर येथे प्रायोगिक तत्त्वावर या यंत्रणेची चाचणी घेतली जाणार आहे.

आगामी काळात या यंत्रणेमुळे काही क्षणांतच हवामानासंदर्भातील अचूक नोंदी मुंबई केंद्रात जमा होतील. दोन महिन्यांनंतर ही यंत्रणा देशभर कार्यान्वित करण्यात येणार आहे.मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या राज्यभरातील निरीक्षण केंद्रांमधील अधिकारी हवामानासंदर्भातच्या (तापमान, आद्र्रता इत्यादी) नोंदी फॅक्स अथवा ई-मेलद्वारे पाठवतात. मात्र भारनियमन तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे प्रत्येक निरीक्षण केंद्रांवरून ही माहिती वेळेत मुंबई केंद्राकडे येत नव्हती. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने ‘हँड हेल्ड डेटा लॉगर’ विकसित केले आहे. मोबाइलसदृश असलेल्या या यंत्रणेत हवामानासंदर्भातच्या नोंदी ‘फीड’ केल्यावर त्या लगेचच विभागवार केंद्रांकडे जमा होतील.

माहिती देताना मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर म्हणाले, ‘हवामानाच्या नोंदीत अचूकता यावी, यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेत चुकीची माहिती फीड झाल्यास त्यामधून लगेच अलार्म वाजतो. यामुळे माहिती फीड करणा-या अधिका-याला पुन्हा हवामानाची नोंद घ्यावी लागेल. या यंत्रणेमुळे दर तीन तासांनी संदेश पाठवणे शक्य होईल.’