पुणे,दि. 23 (प्रतिनिधी) – भ्रष्टाचारामुळे सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील बनत चालले आहे. भ्रष्टाचारातून सामान्य नागरिकांची सुटका करण्यासाठी लोकपाल विधेयक मंजूर करणे आवश्यक आहे. लोकपाल विधेयक मंजूर होणारच. याबाबत जागृती करण्यासाठी आगामी दीड वर्षात राष्ट्रव्यापी दौरा करणार आहे. या दौर्यातून किमान 6 कोटी लोकांना जागृत करून शासनाला लोकपाल विधेयक मंजूर करण्यास भाग पाडू, असा निर्धार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे.
द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनतर्मे कौटुंबिक न्यायालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्यात हजारे बोलत होते. यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विभयकुमार शहारपूरकर यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला होता. ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. हर्षद निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप, द पुणे मॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कवडे, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद पवार आदी उपस्थित होते.
लोकपाल विधेयक संमत झाल्याशिवाय भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळणार नाही. या विधेयकबाबत जागृतीसाठी आगामी दीड वर्षात राष्ट्रव्यापी दौरा करणार असून, कमीतकमी सहा कोटी लोकांना जागृत करणार असल्याचा सांगून हजारे म्हणाले, चांगले लोकप्रतिनिधी जास्तीतजास्त निवडून आले पाहिजेत. यासाठी ‘राईट टु रिजे्नटम हा कायदा पास होणे आवश्यक आहे. या कायद्यानुसार निवडणुकीत उभारलेल्या उमेदवाराच्या संख्येपेक्षा एक बटण जास्त देण्यात येईल. कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास मतदार ते बटण दाबू शकतील. त्या बटणाला सर्वाधिक मते पडल्यास त्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्यात येईल. मात्र, त्या उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढविता येणार नाही. या कायद्यामुळे राजकारणात चांगल्या लोकांची संख्या वाढेल, असेही ते म्हणाले. चंगळवाद संस्कृतीमुळे आनंद मिळणार नाही. तर जनसेवेतून खरा आनंद मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
अॅड. निंबाळकर म्हणाले, स्त्री अत्याचार कमी होण्यासाठी नेहमी कायदे केले जातात. मात्र, कायदे करणे हा पर्याय नाही. तर कायदे करण्यापेक्षा पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे. मात्र, केवळ पुरुषांची मानसिकता बदलूनही स्त्री अत्याचार थांबणार नाहीत. कारण स्त्री अत्याचार करण्यास स्त्रीयाही कारणीभूत असतात. यासाठी स्त्रीयांचाही स्त्रीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.
शहारपूरकर म्हणाले, समजोत्याने घटस्मोट होईल का, हे पाहण्यापेक्षा पती-पत्नी दोघे कसे एकत्र येतील. दोघांतील वाद कसा मिटू शकेल, गैरसमज कसा दूर होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अॅड. राजेंद्र उमाप यांनी विचार व्यक्त केले. गणेश कवडे यांनी प्रास्ताविक केले. स्वाती महांकाळ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सिद्धार्थ देशपांडे यांनी आभार मानले.
………………………..
