सुधीर गाडगीळ यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

पुणे, दि. 22 ( प्रतिनिधी) – पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल पुणे) च्या वतीने देण्यात येणार्‍या ‘पुण्यभूषण पुरस्कारा’ची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या वर्षीचा पुरस्कार प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती फौउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली.
पुण्यभूषण पुरस्काराचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 1 लाख रुपयांची थैली, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पं. भिमसेन जोशी, काका केळकर, शंतनुराव किर्लोस्कर, पु. ल. देशपांडे, राहुल बजाज, डॉ. जब्बार पटेल, डॉ. श्रीराम लागू, डॉ. रोहिणी भाटे, डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यापूर्वी पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
यावर्षीचा पुरस्कार सूत्रसंचालक, मुलाखातकार, पत्रकार, लेखक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या सुधीर गाडगीळ यांना प्रदान करण्यात येणार आहे. गाडगीळ यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याबरोबरच फाउंडेशनच्या वतीने पाच ज्येष्ठ अप्रकाशित स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे. यामध्ये नारायण सुरसे (पुणे), छगनलाल अनेचा (येरवडा), बाळकृष्ण मिरजकर (कोथरूड), चंद्रकांत पायगुडे (लोणावळा), गणपत गायकवाड (वाल्हे) यांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. देसाई यांनी दिली.