मुलांना योग्य वेळी लैंगिक शिक्षण देणे आवश्यक : डॉ. शांता साठे यांचे मत

पुणे, दि. 22 (प्रतिनिधी) – जग वेगाने बदलतं आहे, त्यामुळे तरुणांचा लैंगिकता या विषयाचा दृष्टीकोन बदलला आहे. या मुलांबरोबर संवाद साधून त्यांना स्त्रीत्व कुठे आहे आणि पुरुषत्व कुठे आहे, याची ओळख करून द्यायला हवी, असे प्रतिपादन डॉ. शांता साठे यांनी केले.
लोकमान्य सेवा संघ, पारले, श्री. वा. माटक ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने आगरकर पुरस्कार प्रदान समारंभात त्या बोलत होत्या. शुक्रवारी सायंकाळी कर्वे रोड येथील अश्‍वमेध हॉल येथे हा कार्यक्रम झाला. डॉ. शांता साठे, डॉ. अनंत साठे, प्रतिभा रानडे, विद्या बाळ आदी यावेळी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या हस्ते पुण्याचे डॉ. अनंत साठे व डॉ. शांता साठे या दाम्पत्यास समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. शांता साठे म्हणाल्या, बाईकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टीकोन आगरकर यांच्याकडे होता. त्यामुळे त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार स्वीकारताना आनंद झाला. पालकांनी मुलांशी लहानपणापासूनच लैंगिक शिक्षण या विषयावर बोलायला हवे. शाळेमधील मुलांच्या आणि मुलींच्या शरीरात बदल होत असतात. काय बदल होत आहेत ते त्यांना कळत नसते. त्यामुळे त्यांना यावेळीच लैंगिक शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. प्रेम ही गोडपणाने व्यक्त होणारी गोष्ट आहे. परंतु, आज त्याला विद्रुप स्वरूप आले आहे. स्त्री-पुरुष नात्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलायला हवा.
विद्या बाळ म्हणाल्या, दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर समाजात मोठे परिवर्तन झाले. परंतु, अजूनही परिवर्तन होणे अद्याप बाकी आहे. कायदा आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍यांची मने साम झाली आहेत का हे तपासणे गरजेचे आहे. काळाबरोबर समाज परिवर्तनाच्या कल्पना बदलतात. त्यामुळे लैंगिक शिक्षणासारख्या गोष्टी पुढे यायल्या हव्यात. से्नस या विषयावर भरपूर माहिती उपलब्ध आहे, परंतु, शहाणपण अजूनही आलेले नाही. परंतु, डॉ. साठे दाम्पत्याने लैंगिक शिक्षण या विषयी त्यांनी कायमच समाजप्रबोधन केले. त्यांनी कायमच एकमेकांच्या साथीने काम केले. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळाला आहे, असे त्या म्हणाल्या.
उदय जोशी यांनी श्री. वा. माटक ग्रंथालयाविषयी माहिती दिली. ग. वा. केळकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. शीला बारपांडे यांनी प्रास्ताविक केले.
———