मोहाली कसोटीत पावसाचा व्यत्याय; धवन पदार्पण करणार

मोहाली- मोहालीमध्‍ये पावसाची उघडझाप सुरू असल्‍यामुळे तिस-या कसोटीस प्रारंभ झालेला नाही. अंपायर उपहारानंतर पुन्‍हा एकदा मैदानाची पाहणी करतील. त्यांनतर सामन्याची वेळ ठरली जाणार आहे. ऑस्‍ट्रेलिया संघही स्‍टेडिअममध्‍ये पोहोचला आहे. डावखुरा फलंदाज शिखर धवनही आजच्‍या सामन्‍यातून कसोटी पर्दापण करेल.

ग्राऊंड स्‍टाफ मैदानातील पाणी सुकवण्‍यासाठी शर्थीचे प्रयत्‍न करीत आहेत. दुसरीकडे भरवशाचा फलंदाज चेतेश्‍वर पुजारा तंदुरूस्‍त झाल्‍यामुळे टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. बुधवारी येथील वातावरण खूप उष्‍ण होते. मात्र, गुरूवारी सकाळपासून येथे पावसास सुरूवात झाली.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची टीम मॅथ्यू वेड आणि ब्रेड हॅडिन या दोन्ही यष्टिरक्षकांना संघात निवडू शकते. शेन वॉटसनच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाची फलंदाजी दुबळी झाली असून हॅडिन त्याची जागा भरू शकतो. मोहालीच्या खेळपट्टीविषयी कसलीच शंका नाही, असे भारतीय दौर्‍यावर संकटात सापडलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने सामन्याच्या पूर्वसंध्येला मीडियाला सांगितले. मला विश्वास आहे की, ही खेळपट्टी फिरकीपटूंनाच मदत करेल. कारण यावरील गवत पूर्णपणे कापण्यात आले आहे. खेळपट्टीला बघून मला थोडीसुद्धा शंका आली नाही, असे त्याने म्हटले. वॉटसन आणि माझ्यात कसलेच मतभेद नाहीत.