नवी जुगलबंदी

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे राज ठाकरे यांच्या नादाला लागत नाहीत. नादाला लागत नाहीत म्हणजे राज ठाकरे जे काही बोलतात त्याची ते दखल घेत नाहीत. अशा बोलभांड पुढारयांना काहीही बोलण्याची सवय असते आणि  ते बोलत राहतात. कधी कोणाच्या तरी सोयीसाठी कोणावर तरी बरसतात. अशा वेळी त्यांची दखल घेतली तर त्यांचे महत्त्व विनाकारण वाढते. माध्यमांनाही कोणाला किती मोठे करावे आणि कोणाच्या विधानांना कोणत्या वातावरणात किती महत्त्व द्यावे याचे भान राहिलेले नाही. त्यामुळे ते शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बरोबरीने मनसेला स्थान देतात. त्यामुळे तो महाराष्ट्रातला मोठा पक्ष आहे असा भास निर्माण होतो.

राज ठाकरे यांना बोलण्याचा काही पाचपोच नाही. ते तोंडाला येईल ते बोलत असतात आणि कोणाला काय बोलावे हे त्यांना समजत नाही. लोक महत्त्व देतात म्हणून त्यांनाही आपण राज्यातले फार मोठे पुढारी असल्याच्या भ्रम झाला आहे आणि ते अधिकार वाणीने बोलल्याचा आव आणून सर्वांना झापायला लागले आहेत. तसा आविर्भाव आणायलाही काही हरकत नाही पण त्यासाठी आपले रेकॉर्ड स्वच्छ असायला हवे, आपण जे काही बोलू ते पुरेशा पुराव्यावर आधारलेले असले पाहिजे आणि किमान तर्कशुद्ध असले पाहिजे. पण त्या कशाचाही पत्ता नसताना ते बरळत चालले आहेत.

त्यांनी दिल्लीतल्या बलात्काराबाबत बोलताना, बलात्कार करणारे सारे आरोपी बिहारी आहेत याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते पण आराराबांनी मनसेच्या दोन कार्यकर्त्यांवर असेच सामूहिक बलात्काराचे आरोप आहेत हे राज ठाकरे यांच्या ध्यानात आणून दिले. त्यावर  राज ठाकरे पुन्हा म्हणून त्या प्रकाराविषयी बोलले नाहीत. स्पष्टपणेच सांगायचे तर ते सपशेल तोंडावर पडले पण त्यांची निराधार, अफाट बोलण्याची सवय जात नाही. काल त्यांनी विधान सभेतले विरोधी नेते एकनाथ खडसे यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावला. खरे तर विषय वेगळा होता. मनसेच्या आमदारांना बोलायला वेळ मिळत नाही अशी तक्रार होती पण ती करता करता राज ठाकरे यांनी उगाचच खडसे यांना सेटलमेंट केल्याचा आरोप करून ढुशी मारली. खडसे यांनी या ढुशीला प्रतिढुशी दिली. हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी आपल्या भ्रष्टाचाराचा पुरावा द्यावा असे आव्हान दिले. 

ठाकरे यांच्याकडे खडसे यांच्या भ्रष्टाचाराचा कसलाही पुरावा नाही. पण, आता आरोप तर केला आहे. मग त्यांच्या पक्षाचे आमदार आता, आमचे राज साहेब असे आहेत आणि आमचे राज ठाकरे तसे आहेत, ते पुराव्याशिवाय कधी बोलत नसतात, अशा फुशारक्या मारत विषयांतर करून आपल्या राज साहेबांची फजिती टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. या आमदारांपेक्षा आता राज ठाकरे यांनी बोलणे आवश्यक आहे पण, ते आता मिठाची गुळणी घेऊन बसले आहेत. आता खडसे अधिक आक्रमक होऊन ‘पुरावे द्या नाही तर कोर्टात जातो’ असा इशाराच द्यायला लागले आहेत.  राज ठाकरे यांची वाचा बसली आहे. ते आता उसने अवसान आणून  असेही म्हणतील की, ‘हिंमत असेल तर खडसे यांनी न्यायालयात जावे, मी घाबरत नाही’ वगैरे. पण प्रत्यक्षात ते काहीही पुरावे सादर करणार नाहीत कारण ते त्यांच्याकडे नाहीत. ते आपले राजकारणातले स्थान वाढत चालले आहे या कल्पनेत सर्वांना ढोस देत चालले आहेत. त्यांच्या राजकारणात पोक्तपणा नाही. बालीशपणा आहे. आता त्यांचे आमदार, योग्य वेळी पुरावे दिले जातील, असे म्हणून वेळ मारून नेत आहेत पण त्यात काही परिपक्वता नाही.

असे लोक महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या हाती राज्याची सत्ता द्यावी अशी मागणी करीत आहेत पण तशी ती देणे किती वेडेपणाचे ठरेल हे त्यांच्या या पोरकटपणाने दिसत आहे.  या सगळ्या प्रकाराला आता राष्ट्रवादीचे नेते जितेन्द्र आव्हाड यांनी एक वेगळेच वळण दिले आहे. राज ठाकरे यांनी आरोप केला आणि खडसे यांच्यावर तो झाला आहे. आता आव्हाड यांनी आरोपाचे पुरावे राज ठाकरे यांच्याकडे मागायला हवे आहेत. तसे ते मागत आहेतच पण या प्रकरणात ते भाजपालाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. खडसे यांनी आपल्यावरचे आरोप खोटे आहेत हे सिद्द करावे अशी मागणी आव्हाडांनी केली आहे. हेही अनाठायी आहे. कारण कोणीही कोणावर वाचाळपणाने आरोप करील आणि ते खोटे आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोप झालेल्यांवर येऊन पडेल. हे सर्वथैव अनुचित आहे.

या प्रकरणात राज ठाकरे यांनीच खडसे  यांच्या विरोधात केलेल्या आरोपाचे पुरावे देणे गरजेचे आहे. कदाचित आव्हाड यांना विस्मरण  होत असेल पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी कोणाचेही नाव न घेता, तोडपाणी करण्याचा आरोप केला होता. त्याच्यावर खडसे यांनी पवारांना आडवे उभे घ्यायला सुरूवात केली तेव्हा पवारांचीही अवस्था राज ठाकरे यांच्यासारखीच झाली होती. आता मनसेचे आमदार जसे आपल्या नेत्याला सांभाळून घेत आहेत तसे राष्ट्रवादीच्या गोटाने, हा आरोप खडसेंवर नव्हता, असा खुलासा करून पवारांची फजिती टाळली होती. आता मात्र आव्हाड हे  विसरून राज ठाकरे यांना आणि खडसे यांनाही (विनाकारण) आव्हाने देत आहेत. 

Leave a Comment