काश्मीर खोऱ्यातला वणवा

काल जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर मध्ये दोघा अतिरेक्यांनी फिदायीन हल्ला केला. त्यात दुपारची बातमी हाती येईपर्यंत केन्द्रीय राखीव पोलीस दलातले पाच जवान शहीद झाले. काही नागरिक आणि काही जवान जखमी झाले. राखीव पोलीस दलाचे जवान तयारच होते पण अतिरेक्यांनी क्रिकेटपटूंच्या वेषात येऊन जवानांना चकवले. खेळाचे साहित्य ठेवण्याच्या बॅगेतून शस्त्रे आणली. खेळाच्या मैदानालगतच जवानांचा तळ होता. अतिरेक्यांनी खेळता खेळता एकदम जवानांवर हल्ला सुरू केला. हल्ला तसा अनपेक्षित असल्यामुळे पाचजण शहीद झाले पण काही वेळातच दोघा दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

अशा प्रकारचा हल्ला अपेक्षित होता. कारण अफझल गुरूला फाशी दिल्यापासून काश्मीर खोर्याचतले वातावरण बदलले आहे. लोक संतप्त आहेत कारण अफझल गुरू हा काश्मिरी होता. त्याला फासावर लटकवण्याबाबत सरकार अनमान करीत होते कारण तसे केल्यास काश्मीरमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटेल अशी भीती सरकारला वाटत होती. ती भीती खरी ठरली आहे. या भीतीपोटीच अफझल गुरूला फाशी देण्यापूर्वी त्याच्या कुटुंबियांना कळवण्याच्या आधी  राज्य सरकारला कळवण्यात आले होत. राज्य सरकारनेही  फाशीची बातमी पसरण्याच्या आधीच राज्यात संचारबंदी लागू करण्याची तयारी केली होती. म्हणजे अफझल गुरूला फाशी दिल्यास राज्यात लोक हिंसाचारास प्रवृत्त होतील असे राज्य सरकारलाही वाटत होते. गुरू हा दहशतवादी होता आणि त्याला फाशी दिली पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. अशा निर्णयानंतर त्याला फाशी दिली पाहिजे मग त्याची प्रतिक्रिया काहीही उमटो. त्या प्रतिक्रियेला कसे उत्तरही दिले पाहिजे.

पण गुरुच्या फाशी बाबत काश्मिरी जनतेच्या काही विशिष्ट भावना आहेत. गुरु हा संसदेवर झालेल्या हल्ल्याच्यावेळी तिथे नव्हता, तो हल्लेखोरही नव्हता, त्याच्यावर पोलिसांनीही हल्लेखोरांना  दिल्लीत जागा मिळवून देण्यास मदत केली एवढाच आरोप ठेवला आहे. अफझल गुरूच्या मते तर हाही आरोप बनावट आहे. हल्लेखोर तर घटनास्थळीच मारले गेले. पण पोलिसांना दहशतवाद्यांना मदत करणारे खरे आरोपी पकडता आले नाहीत म्हणून त्यांनी आपल्याला पकडले आहे असे गुरुचे म्हणणे होते. ते खरे असो की खोटे असो. त्याची शहानिशा या ठिकाणी अपेक्षित नाही पण त्याची ही हकिकत प्रसिद्ध झाली आहे आणि अफझल गुरुला विनाकारण फाशी दिली गेली असल्याची आणि त्याला न्याय मिळाला नसल्याची भावना आज काश्मिरी तरुणांत निर्माण झाली आहे आणि तिनेच राज्यातली शांतता भंग पावली आहे.

ही केवळ काश्मीरच्या जनतेचीच नाही तर आमदार आणि मंत्र्यांचीही भावना आहे म्हणूनच त्या सर्वांनी मिळून अफझल गुरुचा मृतदेह मिळावा यासाठी विधानसभेत धुडगुस घातला. एकंदरीत अफझल गुरूची फाशी राज्यात हिंसाचाराचा नवा  अध्याय सुरू होण्यास चालना देणारी ठरणार असे दिसत आहे. १९८४ साली नेमका असाच प्रकार घडला होता. जम्मू काश्मीर मुक्ति आघाडी या संघटनेने त्या काळी जम्मू काश्मीरला स्वायत्तता देण्याच्या मागणीसाठी शांततामय आंदोलन जारी ठेवले होते. या संघटनेच्या मकबूल भट्ट या  दहशतवाद्याने लंडनच्या भारतीय वकिलातीतले अधिकारी रवींन्द्र म्हात्रे यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. त्याला पकडण्यात आले आणि खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी मकबुल भट्टला विनाविलंब फासावर लटकावले पण त्यामुळे राज्यात हिंसक आंदोलन सुरू झाले.  

काश्मिरी जनता भारतापासून मनाने विलग होण्याची प्रक्रिया सुरू झाली. नंतर १९८७ पासून राज्याला हिंसाचाराचे ग्रहण लागले. ते दीर्घकाळ सुरू राहिले. त्यामुळे राज्यात कायमचे  लष्कर तैनात करण्यात आले. हळुहळू काश्मीर शांत होत गेले पण लष्कराची उपस्थिती हीच तिथल्या जनतेच्या रागास कारणीभूत ठरायला लागली. राज्यात शांतता निर्माण झाली. पण लष्कराच्या निमित्ताने असंतोष कायम राहिला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जम्मू काश्मीरच्या समस्यवर कायमचा तोडगा शोधण्यासाठी त्रिसदस्यीय अभ्यासगट नेमला  पण या गटाने या जनतेत आणि भारतीयांत असलेला मानसिक दुरावा कमी करण्यावर भर दिला. तो दुरावा कमी होत नाही. अधुन मधुन काहीतरी घडते आणि तिथल्या जनतेच्या मनातली खदखद कशाना कशाने तरी व्यक्त होते.

२०१० साली तर काही निरपराध तरुणांच्या हत्यांचे कारण होऊन आणि दोन महिलांवर जवानांनी कलेल्या बलात्काराचे निमित्त होऊन वर्षभर हिंसक घटना घडत गेल्या. आता पुन्हा एकदा त्यांना अफझ्रल गुरुच्या निमित्ताने चालना मिळणार असे दिसत आहे. दहशतवादी संघटना नेहमीच राज्यात काही ना काही गडबड करण्याच्या प्रयत्नात असतात. पण जेव्हा जेव्हा जनतेची सहानुभूती मिळत नाही तेव्हा त्यांच्या कारवाया थंड पडतात. आता त्यांना अफझल गुरूच्या निमित्ताने जनतेची सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. या  मनोवस्थेचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या कारवायांना गती दिलेली दिसत आहे. अशा कारवाया सुरू झाल्या की, पोलीस काही तरुणांना अटक करतात. त्यातून चीड निर्माण होते आणि त्यामुळे हिंसाचाराला चालना मिळते. हे चक्र आता काही दिवस फिरत राहणार आहे.

Leave a Comment