श्रीनगर: काश्मीर खोर्यातील बेमिना भागात असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कॅम्पवर गनिमांनी आज अचानक आत्मघाती हल्ला केला. त्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले तर हा हल्ला परतवताना जवानांनी केलेल्या प्रतिगोळीबारात दोन गनीम मारले गेले. गेल्या तीन वर्षातील काश्मीरातील हा सर्वात मोठा फिदायीन हल्ला आहे.
या घटनेच्या संबंधात माहिती देताना अधिकृत सूत्रांनी सांगितले की गनिमांच्या आत्मघाती पथकातील दोन जणांनी हाताबाँब फेकत अंदाधुंद गोळीबार केला. सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमाराला हे हल्लेखोर कॅम्पमध्ये घुसले. त्यांनी हा गोळीबार व बाँबफेक सुरू केल्यानंतर सीआरपीएफ जवानांच्यावतीनेही हल्लेखोरांवर हल्ला सुरू झाला त्यात हे दोघेही जण ठार झाले. गनिमांच्या हल्ल्यात अन्य सात जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेची माहिती विधानसभेत दिली. या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.
ठार झालेल्या हल्लेखोरांचे मृतदेह सीआरपीएफने ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ज्या कॅम्पवर हा हल्ला झाला तो कॅम्प गजबजलेल्या भागात आहे. त्याच्या शेजारी पोलिस पब्लिक स्कूल व अन्य शासकीय कार्यालयांच्या इमारती आहेत. तथापि हा हल्ला झाला तेव्हा ही शाळा बंद होती. विघटनवादी संघटनांनी अफजल गुरूचा मृतदेह परत मिळावा या मागणीसाठी आज बंदचा आदेश दिला होता त्यामुळे ही शाळा बंद होती.
काश्मीर खोर्यात यापूर्वी जानेवारी २०१० मध्ये अशा प्रकारचा आत्मघाती हल्ला झाला होता. त्यानंतर २ मार्चला कुपवारा जिल्ह्यात हंडवारा भागात गनिमांनी दोन पोलिसांची हत्या केली होती.