भ्रष्टाचारंच घेईल काँग्रेसचा बळी: राजनाथ सिंह

वाराणसी: रावणाला रामाने ठार केले, कृष्णाने कंसाला मारले, ओबामाने ओसामाचा अंत केला तशाच प्रकारे काँग्रेसला भ्रष्टाचार मारेल; असे विचित्र वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केले आहे.

राजनाथ सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षपादाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच वाराणसी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर कठोर टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या तीन पक्षांनी मिळून देशाला भ्रष्टाचाराच्या दरीत ढकलले आहे. यांच्यामुळेच भ्रष्टाचार फोफावत चालला आहे. दररोज भ्रष्टाचाराचे नवनवीन घोटाळे उघडकीस येत आहेत; अशी टीका करून यांना जनता २०१४ च्या निवडणुकीत धडा शिकवेल; असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

तसेच मनमोहन सिंग यांच्या ढिसाळ राज्यकारभारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दर्जा घसरला झ आहे. तसेच दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा कारागृहात मृत्यू म्हणजे सरकारच्या सुरक्षा यंत्रणेत खोट असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला.

दरम्यान यशवंत सिन्हा यांच्या राजीनाम्याच्या धमकीच्या आणि आणखी इतर काहींनी पक्षातून राम राम ठोकल्याच्या प्रश्‍नावर उत्तर देताना ते म्हणाले की, या गोष्टी मनावर घ्यायच्या नाहीत. पक्षात येणे-जाणे चालूच राहणार. मात्र जशी काँग्रेसमध्ये अनेकवेळा फाटाफूट झाली तशी भाजपात झाली नाही. हा पक्ष स्थापनेपासून एकसंध आहे; असे स्पष्टीकरण राजनाथ सिंह यांनी दिले.

Leave a Comment