ओएनजीसी वायू उत्पादनासाठी रिलायन्सची मदत घेणार?

नवी दिल्ली दि. १३- पूर्वेकडील कृष्णा गोदावरीच्या खोऱ्यात ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कार्पोरेशनला मिळालेल्या वायूसाठ्यातील वायू बाहेर काढण्यासाठी कंपनी रिलायन्सच्या न वापरल्या गेलेल्या पायाभूत सुविधा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी बोलणी करत असल्याचे तेलमंत्री वीरप्पा मोईली यांनी राज्यसभेत लेखी स्वरूपात प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार ओएनजीसीला कृष्णा गोदावरी खोऱ्यात ९ ठिकाणी वायूसाठे मिळाले आहेत. हे क्षेत्र पूर्ण विकसित करण्यास कांही अवधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत वेळ न घालविता उत्पादन त्वरीत सुरू करता यावे यासाठी रिलायन्सची मशिनरी भाडेतत्वावर वापरावी असा विचार पुढे आला आहे. त्यासंबंधीचे कमी मुदत व दीर्घ मुदतीचे अनेक पर्याय तपासून पाहिले जात आहेत.

ओएनजीसीला २०१६-१७ सालापासून उतपदन सुरू करावयाचे आहे. याच क्षेत्रात रिलायन्सने दिवसाला ८० दशलक्ष क्युबिक मीटर वायू उत्पादन करता येईल अशा प्रकारे पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. त्यात मशीन्स, इंधन वाहून आणण्यासाठी पाईप लाईन अशा अनेक सुविधा आहेत. मात्र रिलायन्सचे सध्या येथे केवळ १७ दशलक्ष क्युबिक मीटर उत्पादनच सुरू आहे. ते ८० दशलक्ष क्युबिक मीटरवर जाण्याची शक्यता नसल्याचे रिलायन्सचे म्हणणे आहे.

ओएनजीसी दिवसाला २२ दशलक्ष कयुबिक मीटर वायू उत्पादन अपेक्षित करत असून त्यासाठी रिलायन्सचीच मशिनरी वापरली गेली तर उत्पादन लवकर सुरू करणे शक्य होणार असल्याने रिलायन्स बरोबर सहकार्य करार करण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.