मुंबई: सद्ध्याचीनंबर वनची अभिनेत्री करीना कपूर लवकरच सतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर शिव शंकराची भूमिका ॠतिक रोशन करणार आहे. ‘इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा’ या गाजलेल्या पुस्तकावर करण जोहर ‘शुद्धी’ नावाचा सिनेमा बनवत आहे. हा सिनेमा शंकर-पार्वतीच्या दंतकथेवर आधारित आहे.
गेल्यावर्षी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळीच शिवाच्या भूमिकेसाठी ॠतिक रोशनचे नाव नक्की करण्यात आले होते. मात्र सतीच्या भूमिकेत कोण असेल, यावर प्रश्नचिन्ह होते. कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर या टॉपच्या अभिनेत्रींची या भूमिकेसाठी स्पर्धा सुरू होती. अखेर सतीची भूमिका करीनाच्या पदरात पडली आहे.
करीना आणि ॠतिक यांनी सुरूवातीच्या काळात अनेक सिनेमे एकत्र केले होते. मै प्रेम की दिवानी हूँ, यादे, कभी खुशी कभी गम या चित्रपटात ॠतिक-करीनाची जोडी गाजली होती. ॠतिक शक्तिशाली आणि नृत्यनिपुण शिवाच्या भूमिकेत चपखल बसतो. करीना सतीच्या भूमिकेला किती न्याय देणार हे लवकरच पाहायला मिळेल.