पुढच्या वर्षात रशिया महिला अंतराळवीर पाठविणार

मास्को दि.७ – दोन दशकांच्या गॅपनंतर पुढील वर्षाच्या म्हणजे २०१४ च्या मध्यास रशियन महिला अंतराळात झेप घेणार असल्याचे स्पेस प्रशिक्षण केंद्रातील अधिकाऱ्यानी सांगितले. येलेना सेरोवा ही ३६ वर्षीय महिला स्पेस फ्लाईटची तयारी करत असून ती सहा महिने अंतराळात राहणार आहे.

यंदा महिला अंतराळवीर अंतराळात गेल्याच्या घटनेचा ५० वा वर्धापनदिन रशियात साजरा केला जात आहे. १९६३ साली जूनच्या १६ तारखेला व्हेलेरिना तेरेश्कोव्ह ही रशियन महिला अंतराळात झेपावली होती. तर स्तेव्हलाना सव्हिस्काव्हा ही महिला स्पेस वॉक करणारी पहिली महिला अंतराळवीर ठरली होती. नासा नियमितपणाने महिला अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अनेक प्रकारच्या कामगिरी पार पाडण्यासाठी पाठवीत आहे मात्र १९८० पासून आत्तापर्यंत केवळ एकच रशियन महिला अंतराळात गेली आहे.

येलेना कॉडकॉव्ह या महिलेने यापूर्वी मीर अंतराळस्थानकात पाच महिने वास्तव्य केले आहे. १९९४ -९५ या काळात ती अंतराळात होती. आता सेरोव्हा सहा महिने अंतराळात राहणार असून तिच्यापाठोपाठ २८ वर्षीय अॅना किकिना हीही अंतराळात झेपावणार आहे असे समजते.