गृहखात्यातील हेरगिरी करणार्‍या कर्मचार्‍याची चौकशी

नवी दिल्ली: केंद्रीय गृहखात्यातील एक अधिकारी पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत असल्याची माहिती समोर आली असून त्या अनुषंगाने या आधिकार्‍याची सध्या चौकशी केली जात आहे.

अलिकडेच पोखरण येथील हवाईदलाच्या प्रात्यक्षिकांच्यावेळी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या सुमेर खान नावाच्या आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हस्तकाला अटक करण्यात आली आहे. गृह विभागातील हा कर्मचारी त्याचा साथीदार असल्याची बाब समोर आली असून त्याची या अनुषंगाने चौकशी केली जात आहे.

सुमेर खान या आयएसआयच्या हस्तकाला गृहविभागाकडून काही माहिती त्या कर्मचार्‍याने पुरवली असल्याची शक्यता आहे. या कर्मचार्‍याची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. तथापि त्याची कसून चौकशी केली जात असून त्याच्या घराचीही तपासणी केली जात आहे.

भारतीय हवाईदलाने नुकतीच राजस्थानातील पोखरण येथे युद्ध प्रात्यक्षिके केली. या प्रात्यक्षिकाच्या काळात लष्करी गुप्तचर यंत्रणांनी काही फोन कॉल्सचे संदेश तपासले असता त्यांना त्या भागात आयएसआयसाठी काम करणारा सुमेरखान नावाचा इसम सापडला होता. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत केंद्रीय गृहमंत्रालयातील या कर्मचार्‍याचेही नाव समजले आहे.