भांगेत तुळस या वाक्प्रयोगातील भांग हा शब्द केसाच्या भांगासाठी वापरलेला नाही. तो प्यायच्या भांगेसाठी वापरला आहे. आता आपल्या वापरात इतके हिंदी शब्द यायला लागले आहेत की, लोक शिवरात्रीला आणि होळीला जय बं बोले नाथ म्हणून जी भांग पितात तिलाच आपण हिंदी भाषकांप्रमाणेच भंग म्हणायला लागलो आहोत. या भंगमुळे आपल्या मराठी भाषेच्या शुद्धतेचा भंग होतो याची आपल्याला काही क्षिती नाही. या भंगलाच मराठीत भांग म्हणत असतात हे लोक विसरून गेले आहेत इतकी आपण आपली भाषा भ्रष्ट केली आहे.
आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन आहे. त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात भाषेतल्या अशा घुसखोरीच्या विरोधात आंदोलन केले होते. महापौर, संसद, विधानसभा, महापालिका, कार्यालय असे किती तरी शब्द त्यांच्यामुळेच मिळाले आहेत. आज सावरकरांची पुण्यतिथी आणि उद्या माय मराठी दिन आहे. या निमित्ताने भांग पिल्यागत वागून मराठी भाषेला असे दूषित करणार्यां चे थोडी दखल घेतली. भांगेत तुळस म्हणजे काय हे सांगायचे राहूनच गेले.
भांगेत तुळस म्हणजे सारे काही दूषित, सारे काही वाईट एकत्र झालेले असते आणि त्यात एखादीच गोष्ट छान असते. नशा आणणार्याम भांगेत एकदम पवित्र तुळस कशी वाटेल ? तसा हा प्रकार असतो. सारे डोमकावळे एकत्र आलेले असावेत आणि त्यात एकच पांढराशुभ्र राजहंस बसलेला दिसावा मग कसे वाटते ? आता या वाक्प्रचाराची आठवण का झाली ? महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात दुष्काळाची जाणीव न ठेवता पैशाची उधळपट्टी करणार्याण लोकांचा सुळसुळाट झाला आहे आणि त्यात मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेने चक्क दुष्काळाची जाणीव ठेवून मुंबईच्या महापौरांना चार खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी महापौरांना पत्र पाठवून दुष्काळाची जाणीव ठेवा आणि उधळपट्टी थांबवण्याचे आवाहन केले आहे.
सध्याच्या दुष्काळी स्थितीतही काही राष्ट्रवादी नेत्यांनी राजेशाही थाटात विवाह समारंभ पार पाडले त्यांची खूप चर्चाही झाली. या समारंभावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा नेत्यांच्या आणि कंत्राटदाराच्या घरावर आयकराच्या धाडीसुध्दा पडल्या. या गोष्टीवरून मुंबई महानगरपालिकेने काही धडा घेतला नाही असे दिसते. कारण राज्यात दुष्काळाचे थैमान चालू असताना या महानगर पालिकेने नगरसेविकांचे एक प्रशिक्षण शिबीर चक्क महाबळेश्वरमध्ये आयोजित केले. तशी मागणी काही नगरसेविकांनीच केली होती आणि ती करताना मुंबई बाहेर कार्यक्रम असावा असे या नगरसेविकांनी पत्रात म्हटले होते.
महापौरांना ही मागणी फेटाळता आली असती. महाराष्ट्रात दुष्काळ असताना आपण जनतेच्या पैशात बाहेर खर्च करून शिबिरे घेत असू तर आपल्याला सामाजिक भान नाही अशी टीका आपल्यावर होईल तेव्हा शिबीर घेणे योग्य आहे. पण ते शहराबाहेर नको असे महापौरांना म्हणता आले असते परंतु महापौरांनीसुध्दा ही विनंती शिरसावंद्य मानून बाहेर शिबीर तर ठेवलेच पण ते चक्क महाबळेश्वर मध्ये ठेवून उन्हाळ्यात थंडावा आणि प्रशिक्षण असा दुहेरी बेत केला. नगरसेवक असोत की नगरसेविका असोत त्यांना प्रशिक्षणाला जायला नको वाटते. प्रशिक्षणाचा काही कार्यक्रम असला की त्यांची उदासीनता दिसून येते. शंभर नगरसेवकांना पत्रे पाठवली तर १५-२० जण येतात आणि तेही मधूनच सटकायला लागतात. त्यांना प्रशिक्षणात काही रस नसतो. त्यांना अशा कार्यक्रमात रस वाटावा म्हणून महाबळेश्वरची योजना केली असावी. महाबळेश्वरला शिबीर होणार म्हणतातच शत प्रतिशत हजेरी लावली जाणार. म्हणून महापौरांनी हा शीतल योग साधला.
मागणी करणाऱ्या. नगरसेविकांना तर स्थितीचे भान नाहीच कारण बरेच नगससेवक समाजसेवेच्या भावनेने निवडून आलेले नसतात. ते काही तरी कमायी करण्याच्या आणि मौजमजा करण्याच्या कल्पनेने प्रेरित झालेले असतात. पण महापौरांनाही ते असू नये याचे आश्चर्य वाटते. हे महापौर तर शिवसेनेचे आहेत. अर्थात हाताची सगळीच बोटे काही सारखी नसतात. या सर्व नगरसेविकांना या ट्रीप कम प्रशिक्षण शिबिराचे निमंत्रण आले. हे शिबीर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे पण काही नगर सेविकांनी महाबळेश्वर सहलीची तयारीही केली असेल. या सर्व नगरसेविकांना राष्ट्रवादी नगरसेविका प्रतीक्षा घुगे या मात्र अपवाद आहेत. त्यांनी महाबळेश्वरचे हे निमंत्रण चक्क नाकारले आहे.
आपण राज्यातली दुष्काळी स्थिती पाहता या शिबिराला येऊ शकत नाही असे तर त्यांनी महापौरांना कळवले आहेच पण त्यांनी हे शिबीर रद्द करण्याची मागणी केली आहे. राज्यात दुष्काळ पडला असताना आपण सार्वजनिक पैशाची अशी आपल्या छान छौकीसाठी उधळपट्टी करतो हे उचित नाही असे त्यांनी खडसावले आहे. प्रतीक्षा घुगे एवढेच करून थांबलेल्या नाहीत तर त्यांनी आपले एक महिन्याचे वेतन दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी दिले आहे. यापुढे जाऊन त्यांनी मुंबईतल्या सर्व नगरसेविकांनी एक महिन्याचे वेतन दुष्काळग्रस्तांना दिले पाहिजे असे आग्रहाने प्रतिपादन केले आहे. महापौरांनी ही मोहिम सुरू करावी आणि सर्वांचे महिन्याचे वेतन एकत्रित करून ते दुष्काळग्रस्तांना द्यावे .त्याचबरोबर जनतेच्या पैशात थंड हवेच्या ठिकाणी जाऊन मजा मारणारा हा कार्यक्रम रद्द करावा असे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या एका मंत्र्याच्या उधळपट्टीमुळे अस्वस्थ झाले होते. परंतु त्यांच्या अस्वस्थतेची दखल न घेता त्यांच्या पक्षातल्या नेत्यांची उधळपट्टी जारीच राहिली. अशा स्थितीत सुध्दा मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेने सामाजिकतेचे भान ठेवावे ही स्वागतार्ह आहे.