कोची दि.२८ – पूर्णपणे भारतात तयार केलेली लक्झरी कार मेकर व्होल्व्होची व्होल्व्हो व्ही ४० क्रॉस कंट्री एप्रिलच्या सुमारास भारतीय बाजारात दाखल होईल असे समजते. कोचीच्या रस्त्यावर या गाडीच्या चाचण्या घेताना कांही जणांना तिचे दर्शन झाले आहे. आज भारताचे या वर्षाचे अंदाजपत्रक सादर होत आहे. त्यानंतर लगेचच या गाडीची घोषणा केली जाणार असल्याचे कंपनीचे विपणन अधिकारी सुदीप नारायण यांनी सांगितले.
ही गाडी एप्रिलमध्ये भारतीय बाजारात येत असली तरी त्याची नक्की तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. बीएमडब्ल्यू एकस १ आणि ऑडी क्यू ३ बरोबरच ही गाडी बीएमडब्ल्यू १ सिरीज आणि मर्सिंडीज ए या गाड्यांशी स्पर्धा करू शकणार आहे कारण ही लक्झरी कार पूर्णपणे एसयूव्ही नाही तर ती हचबॅक लक्झरी कार आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये ही गाडी उपलब्ध होणार आहे.
या दशकांत भारतीय बाजारपेठेतील किमान १५ टक्के हिस्सा मिळविण्याचा कंपनीचा निर्धार असून त्यादृष्टीने गाडीचे मार्केटिंग केले जाणार आहे असेही सुदीप नारायण यांनी सांगितले.