देवनागरीचा वापर सोळाव्या शतकापासूनंच

पुणे: शिवकाळात; अर्थात सोळाव्या शतकात मोडी लिपीतून व्यवहार सुरू होते हे सर्वज्ञात आहे. परंतु देवनागरी लिपीचाही वापर तेव्हापासून सुरू झाला होता; या गोष्टीला बळ देणारा एक महत्त्वाचा दस्तावेज संशोधकांच्या हाती लागला आहे. जगप्रसिद्ध वनस्पती अभ्यासक हेन्रिक व्हॅन र्‍हीड याने १६७५ साली प्रसिद्ध केलेल्या ‘हॉर्टस मलबारिकस’ या लॅटिन भाषेतील ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील वैद्यांनी मराठी भाषेत देवनागरी लिपीत लिहिलेले शपथपत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. हॉलंडमधील अ‍ॅमस्टरडॅम येथे प्रसिद्ध झालेल्या या ग्रंथातील हे पहिले मराठी शपथपत्र नुकतेच अभ्यासकांना उपलब्ध झाले आहे.

वनस्पती संशोधक डॉ. मंदार दातार यांना संशोधनादरम्यान हे पत्र मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोडी लिपीतूनंच व्यवहार होत असंत. पण बोलीभाषा मराठी होती. या काळात डच लष्करी कमांडंट व्हॅन र्‍हीड यांनी भारतात येऊन महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील वनस्पतींचा अभ्यास केला. येथील वनौषधींचे महत्त्व, त्यांचा वापर आणि इतर वनस्पतींची माहिती त्यांनी जाणून घेतली. यासाठी त्यांना रंगा भट, विनायक पंडित आणि अप्पू भट या तीन वैद्यांनी मदत केली. या अभ्यासातून र्‍हीड यांनी ’हॉर्टस मलबारिकस’ हा बारा खंडांचा ग्रंथ लिहिला.

पुस्तक प्रसिद्ध करण्यापूर्वी मिळालेली सगळी माहिती अधिकृत असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी या तिघांकडून मराठी भाषेतून शपथपत्र लिहून घेतले. पुढे अ‍ॅमस्टरडॅमला गेल्यावर त्यांनी १६७८ मध्ये ग्रंथ प्रकाशित केला. त्यामध्ये या वैद्यांचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. ‘वेगवेगळ्या गावांत फिरून वनस्पतींची फुले, फळे आणि ॠतूनुसार होणार्‍या बदलांचा केलेला अभ्यास; या काळात आलेले अनुभव आणि आयुर्वेदीय ग्रंथांतील संदर्भांना अनुसरूनच आम्ही माहिती दिली आहे.’

या वनस्पतींची रेखाटनेही यासाठी काढली आहेत, असे या वैद्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. सोळाव्या शतकातील मराठी भाषेत देवनागरीत प्रसिद्ध झालेले हे आतापर्यंत सापडलेले हे पहिलेच पत्र असण्याची शक्यता आहे; अशी माहिती डॉ. दातार यांनी दिली आहे.

Leave a Comment