पुतण्यांची लढाई मुद्द्यावरून गुद्द्यांवर

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यानंतर संतप्त मनसैनिकांनी मुंबई उपनगरातील राष्ट्रवादीच्या दोन कार्यालयांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राज्यात अन्यत्रही अशा प्रकारच्या हिंसक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात दुष्काळी दौऱ्यावरून सत्ताधारी पक्षांना लक्ष्य केल्यानंतर राज आणि उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दीक युद्धाच छेडले गेले. मात्र ठाकरे यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री अहमदनगर येथे काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने हे युद्ध आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आले आहे.

मनसे व राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आमने-सामने आल्याने राज्‍यात अनेक ठिकाणी एसटी बसेसची तोडफोड करण्‍यात आली आहे. यवतमाळमध्‍ये दोन एसटी बसेसची तोडफोड करण्‍यात आली. नांदेडमध्‍ये भोकर येथे एक बस जाळण्‍यात आली. नागपुरातही नंदनवन भागात स्‍टार बसची तोडफोड झाली. बीडच्‍या माजलगावातही सात बसेसची तोडफोड करण्‍यात आली. तसेच अकोल्‍यातही राष्‍ट्रवादीचे कार्यालय जाळण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. मुंबई महापालिकेत राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या कक्षाची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. या प्रकारानंतर महापालिकेबाहेर सुरक्षा वाढविण्‍यात आली आहे.

मनसेचा बालेकिल्ला पुण्‍यात या घटनेचे पडसाद उमटले. पुण्‍यात मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचे पोस्‍टर्स जाळले. टिळक रस्‍त्‍यावर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या शहर कार्यालयावर काही कार्यकर्त्‍यांनी दगडफेक केली. ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार विलास गुंडेवार, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण आणि राष्ट्रवादीचे शिवाजी माने यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली आणि त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. त्याचबरोबर लातूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आला आहे. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात सर्वत्र पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. पुणे येथे राष्ट्रवादीने मोर्चा काढून राज ठाकरे यांनी पुण्यात येउन दाखवावे असा इशारा दिला आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगावात मनसे कार्यकर्त्यांनी सात बसेसची तोडफोड केली. नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये एका बसची जाळपोळ करण्यात आली. अकोला जिल्ह्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी अ‍ॅसिड आणि प्लास्टिकचा वापर करून कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला. तसंच राष्ट्रवादीच्या रुग्णवाहिकेची मोठी तोडफोड केली.

Leave a Comment