रूपी बँकेवरील निर्बंधामुळे ग्राहकांना झटका

पुणे: कर्जाची थकबाकी आणि संचालकांमध्ये असलेल्या वादामुळे रिझर्व्ह बँकेने रूपी सहकारी बँकेवर निर्बंध लादल्यानंतर ग्राहकांना झटका बसला आहे. बँकेच्या नाजूक आर्थिक स्थितीचा इशारा आपण तीन वर्षांपूर्वीच दिला होता; असे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान; बँकेच्या ६ संचालकांनी आपले राजीनामे परत घेतले आहेत. पुण्यात मुख्यालय असलेल्या रूपी सहकारी बैंकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्यानंतर आजपासून खर्‍या अर्थाने ग्राहकांना झटका बसायला सुरूवात झाली. पुढल्या ६ महिन्यांत ग्राहकांना जास्तीत जास्त १ हजार रुपये केवळ एकदाच काढता येणार आहेत.

शनिवारी हे निर्बध लादण्यात आले. मात्र त्या दिवशी बँकेचा अर्धवेळ कामाचा दिवस आणि काल रविवारची सुटी असल्यामुळे सोमवारपासून ग्राहकांना याचा झटका बसणार हे निश्‍चित. विशेषत: निवृत्ती वेतनधारकांची यामुळे मोठीच अडचण होणार आहे.

रुपी बँकेत १४०० कोटींच्या ठेवी असून ८०० कोटींचे कर्जवाटप केले आहे. सन २००२ पूर्वी दिलेल्या कर्जांची योग्य वसुली करता न आल्यामुळे बँक अडचणीत आली आहे. राज्यभर रुपी बँकेचे सुमारे ७ लाख ग्राहक आहेत.