हैदराबाद: पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलसुखनगर येथे भेट देऊन स्फ़ोट झालेल्या ठिकाणांची पाहणी केली त्याचप्रमाणे दोन खाजगी रुग्णालयात भेट देऊन स्फोटात जखमी झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी आंध्र प्रदेशचे राज्यपाल इएसएल नरसिंहन आणि मुख्यमंत्री एन किरणकुमार रेड्डी पंतप्रधानांसमवेत उपस्थित होते.
बुधवारी दोन ठिकाणी झालेल्या स्फोटांनी १६ जणांचा बळी घेतला तर ११७ जण जखमी आहेत. पंतप्रधानांनी दिलसुखनगर येथील पहिला स्फोट झालेले चित्रपटगृहानजिकचे ठिकाण आणि नंतर स्फोट झालेला बस थांबा या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाबाबत सिंग यांना माहिती दिली.
रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या रुग्णांची सिंग यांनी भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून पंतप्रधानांनी या स्फोटाबाबत चिंता व्यक्त केली. या स्फोटात मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधानांनी जनतेला शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले. स्फोटांसारख्या भ्याड कृत्यांनी जनतेने विचलित होऊ नये; असेही ते म्हणाले.
दरम्यान; येथील साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारणारे पत्र भारतीय जनता पक्षाचे आंध्रप्रदेश अध्यक्ष जी. किशन रेड्डी यांना आल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे पत्र लष्कर ए तैय्यबा या दहशतवादी संघटनेचे असल्याचा सूत्रांचा दावा असून अशाप्रकारे आणखी दहशतवादी कृत्य घडविण्याची धमकीही या पत्रात देण्यात आली आहे.
रेड्डी यांनी हे पत्र पोलिसांच्या हवाली केले असून हे पत्र खरोखर ‘लष्कर’चे आहे काय; याची खातरजमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दहशतवाद्यांचे पुढील लक्ष्य बेगम बाजार परिसर असेल; असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.