सांगली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजितदादा आणि आर. आर. आबा यांच्यावर केलेल्या टीकेचे सांगलीत संतप्त पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सांगलीतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आणि सोलापुरातही राज ठाकरे यांचे पोस्टर जाळले आणि आपला निषेध व्यक्त केला.
बेताल आणि बाष्कळ बडबड करून आमच्या नेत्यांविरोधात टींगल केली जाते. ज्यांनी अनेक वर्ष सामान्यांसाठी काम केले; त्या आमच्या नेत्याबद्दल राज ठाकरे यापुढे बोलले तर राष्ट्रवादीचा कोणताच कार्यकर्ता सहन करणार नाही; अशी निदर्शकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान कार्यकर्त्यांनी निदर्शने करून राज ठाकरेंच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सोलापूरात शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर बोचरी टीका केली होती.