नक्वींना परदेशातून धमकी

नवी दिल्ली – लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याच्या विरोधात न बोलण्याची धमकी आपल्याला परदेशातून देण्यात आल्याचा दावा भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे. तोयबा ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना आहे.

भाजपचे उपाध्यक्ष असलेल्या नक्वी यांनी संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. परदेशातून मला १६ फेबु्रवारीला एक दूरध्वनी आला. हा कॉल करणार्‍या व्यक्तीने हाफिजच्या विरोधात बोलू नका, अशी धमकी मला दिली. या कॉलबाबतची माहिती मी पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री आणि गृहसचिवांना कळवली आहे, असे ते म्हणाले.

दहशतवादाशी संबंधित मुद्दे केंद्र सरकारने प्रभावीपणे हाताळावेत; अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. देशातील शांतता बिघडवण्याच्या उद्देशातून दहशतवादाशी संबंधित घटक काम करत असल्याचेच काल हैदराबादमध्ये झालेल्या स्फोटांवरून आणि धमकीच्या कॉलवरून स्पष्ट होते, असे मतही नक्वी यांनी व्यक्त केले.