सोने चांदीचे भाव गडगडले

मुंबई दि.२२ – आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर पुन्हा मजबूत झाल्याने आणि त्याचवेळी जागतिक बाजार घसरल्याने देशात सोने चांदीच्या भावात पुन्हा घसरण झाली आहे. सोन्याचे भाव तीस हजार रूपयांच्या खाली आले असून स्टँडर्ड सोने २९७५० तर दागिन्यांसाठी वापरले जाणारे सोने २९५२० रूपयांवर आले. चांदीच्या भावातही घसरण झाली असून चांदीचा भाव किलोला ५४५५० वर आला.

डॉलर मजबूत झाल्याने तसेच अमेरिकी फेडरल बँक आपल्या धोरणात बदल करणार असल्याच्या बातमीने गुंतवणूकदार तसेच साठेबाजांनी पैसा कॅश करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोने चांदी बाजारात विक्रीला आणली. परिणामी या दोन्ही धातूंचे भाव कोसळून सात महिन्यातील नीचांकी पातळीवर आले. डॉलर सध्या सहा महिन्यातील उच्चांकी पातळीवर आहे. सिंगापूर बाजारात सोने १५५५ डॉलर्स प्रति औंसावर पोहोचले असल्याचेही समजते. आणखी काही दिवस हाच प्रवाह राहिल असा जाणकारांचा अंदाज आहे.