वनतस्करांच्या हल्ल्यात नऊ जखमी

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरच्या जंगलात गस्त घालणार्‍या नवविभागाच्या कर्मचार्‍यांवर वनतस्करांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री उशीरा घडली. या हल्ल्यात एक उपवनसंरक्षक गंभीर जखमी झाला असून जखमींना नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

वनविभागाच्या कर्मचार्‍यांचे १५ ते २० जणांचे एक पथक सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरच्या जंगलात गस्त घालत होते. यावेळी वनतस्करांच्या एका टोळीने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. वनविभागाच्या कर्माचार्‍यांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एका वनतस्कराचा मृत्यू झाल्याचे कळते. मात्र यासंदर्भात पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

दरम्यान, देचलीपेठच्या क्षेत्रात वनपथकावर हल्ला करणार्‍या तस्करांपैकी तीन जणांना रविवारी अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात शुक्रवारी गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या पथकावर तस्करांनी हल्ला केला होता. तसेच चार कर्मचार्‍यांना सलग आठ तास ओलीस ठेवून बेदम मारहाण करण्यात आली होती.

पथकावर झालेल्या या भीषण हल्ल्यानंतर वनविभागाचे अधिकारी तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व गृहमंत्री आर.आर. पाटील यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे.