
मुंबई: भास्कर जाधव यांच्या आयकर विभागाने केलेल्या चौकशीनंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही आरोप केले आहेत. भास्कर जाधव यांनी मंत्रीपदावर असताना केलेला भ्रष्टाचार आणि त्यातून मिळवलेल्या पैशातूनच त्यांनी हा राजेशाही लग्नसभारंभ आयोजित केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. तसेच भास्कर जाधव यांनी ज्या मैदानावर लग्न झाले; त्या मैदानावरील आरक्षण उठवण्याचे प्रयत्नही केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचेच माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना आपल्या मुलामुलीच्या लग्नात उधळपट्टी करणारे राज्यमंत्री भास्कर जाधव आता आणखी अडचणीत आले आहेत. भास्कर जाधव यांची सोमवारी इन्कम टॅक्सच्या अधिकार्यांनी चिपळूणमधल्या घरी चौकशी केली. भास्कर जाधव यांच्याकडील लग्नाच्या जेवणाचे कंत्राट घेणार्या कराडच्या शहा कन्स्ट्रक्शनच्या मालकांच्या घरी आणि हॉटेलवर इन्कम टॅक्सच्या पथकाने सोमवारी धाड घातली. त्यात काही महत्त्वाची कागदपत्र सापडली असून भास्कर जाधव यांची चौकशी करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
भास्कर जाधव यांनी तब्बल दीड तास चौकशी झाल्याचे समजते. रात्री आठ ते साडे नऊ वाजेपर्यंत इन्कम टॅक्सच्या ११ अधिकार्यांच्या पथकाने जाधव यांची चौकशी केली. या चौकशीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात येत आहे. मुंबई आणि पुणे विभागाच्या अधिकार्यांनी मिळून ही चौकशी केल्याचे समजले.
या उधळपट्टीबाबत शरद पवार यांनी भास्कर जाधव यांना फटकारले होते.