भंडारा: तीन बहिणींवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट

भंडारा: मुरमाडी (लाखनी) येथील बोरकर कुटुंबातील तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक राजेंद्र सिंह यांनी दिली.

मुरमाडी (लाखनी) येथील ठवरेनगरातील जयपाल बोरकर यांच्या तनुजा, प्रिया आणि प्राची या तीन मुली गुरुवारी दुपारी शाळेतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या रात्रीपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या आजोबांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शनिवारी (ता. १६) सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावरील भगवान ढाबा मागील श्री. चोले यांच्या शेतातील विहिरीत त्याफ तीनही बहिणींचे मृतदेह आढळून आले.

मृत प्राचीच्या नाकातून रक्त सांडत होते. त्यामुळे या बालिकांची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा संशय गावकर्‍यांनी व्यक्त केला होता. रविवारी सकाळी तीनही मृतदेहांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

त्यानंतर कुटुंबीयांना मृतदेह सोपविण्यात आल्यानंतर सायंकाळी सातला तीनही बहिणींवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, वैद्यकीय अहवाल मंगळवारी मिळाला असून, त्यामध्ये बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.