‘धमक’च्या गाण्यांचे रिमिक्सिंग आणि मास्टरिंग लंडनमध्ये

मराठी चित्रपटांच्या कक्षा खरोखर रूंदावल्या आहेत. एकीकडे देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये मराठी चित्रपटांचा डंका वाजतो आहेच; दुसरीकडे मराठी चित्रपटांचे मेकिंगही आता सातासमुद्रापलिकडे होऊ लागले आहे. विदेशात गाण्यांचे चित्रीकरण केले जाणे ही मराठीसाठी आता फार मोठी बाब राहिली नसून पोस्ट प्रॉडक्शनसाठीही आता मराठीने विदेशाच्या दिशेने उड्डाण केले आहे.

दिग्दर्शक राजेंद्र बांदिवडेकर यांनी एक धाडसी निर्णय घेत ‘धमक’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या गाण्यांचे रिमिक्सिंग आणि मास्टरिंग लंडनमध्ये केले. मेघना नायडू तसेच मुमैत खान यांसारख्या बॉलीवूडमधील नायिकांसोबत चित्रीकरण करून मराठी रसिकांना बॉलीवूडच्या तोडीचा चित्रपट देण्याचा आपला मनसुबा बांदिवडेकरांनी यापूर्वीच स्पष्ट केला आहे. त्यामुळेच लंडनमध्ये गाण्यांचे रिमिक्सिंग आणि मास्टरिंग हे त्यापुढचे पाऊल मानले जात आहे.

सीएस फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात सहा गाणी असून या सर्व गाण्यांचे रिमिक्सिंग आणि मास्टरिंग लंडनमधील ग्लोब रेकॉर्डिंग स्टुडिओत केले. आजच्या आधुनिक युगात कालबाह्य होत असलेल्या रावण हत्ता या वाद्यासह चेलो, वेवला, ट्रम्बॉन, ट्रम्पेड, सेक्सोफोन यांसारख्या वाद्यांची अचूक सांगड घालण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक अँन्ड लाईव्ह इन्स्ट्रुमेंटचा (की -बोर्ड) योग्य रितीने वापर करून संगीतकार निर्मलकुमार यांनी ही गाणी मराठीतील आघाडीच्या गायकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केली आहेत.

‘धमक’ या चित्रपटामध्ये अनिकेत विश्वासराव आणि गिरीजा जोशी या मुख्य जोडीखेरीज मोहन जोशी, अशोक समर्थ, विजू खोटे, विद्याधर जोशी, उमा सरदेशमुख, जयवंत वाडकर, धनंजय मांद्रेकर, अजय पाध्ये, अरविंद धनु, चेतन खरात, प्रदिप पळदे, सुजीत मुकते, गिरीश साळवी आणि सुनील शिंदे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे असून कॅमेरामन आहेत प्रसाद भेंडे.